रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन अनियंत्रित होऊन मजुराचा मृत्यू

November 25,2020

गडचिरोली : २५ नोव्हेंबर - बोरवेल दुरुस्तीसाठी जात असलेल्या वाहन रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनियंत्रीत होऊन पलटल्याने झालेल्या अपघातात वाहनावरील मजूर युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मेडाराम गावाजवळ घडली. रमेश बापू अडगुरी रा. बोरायीगुड्डम असे मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. यात आणखी काही मजूर जमखी झाल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग असलेल्या ३५३ सी या मार्गावरुन एम. एच. ३३ एफ. १२९१ या क्रमांकाचे हातपंप वाहन सिरोंचाकडे येत होते. दरम्यान सिरोंचापासून ७ किमी अंतरावर असलेल्या मेडाराम गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावरच उलटले. यात रमेश अडगरी हा तरुण मजूर जागेवरच ठार झाला. तर वाहन चालकासह काही मजूर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर जखमी मजुरांची नावे कळू शकली नाही.

सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा सिरोंचा राष्ट्रीय महामागार्ची दुरावस्था झाली असतांना शासन व प्रशासनाने मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याबाबत वेळोवेळी आंदोलन पुकारण्यात आल्याने प्रशासनाने रस्त्याची थातुरमातूर दुरुस्ती करीत लाखो रुपये खर्ची घातले. मात्र ही दुरुस्ती केवळ पांढरा हत्ती ठरली आहे. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात घडून आले आहेत. यातच आज घडून आलेल्या अपघातात एका मजुराने प्राण गमाविल्याने यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.