ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने युवक जागीच ठार

November 25,2020

गडचिरोली : २५ नोव्हेंबर - सिमेंट विटा घेऊन धानोराकडे येत असतांना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना आज, मंगळवार 2४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील मुंगनेर पासून १ किमी अंतरावर घडली. जयंत जगदीश बोस (३२) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात तीन मजूर जखमी झाल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक जयंत बोस यांच्या स्वत:च्या घराचे बांधकाम सुरु होते. दरम्यान आपल्या भावाकडे असलेल्या सिमेंट विटा घेऊन येत असतांना धानोरा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या मुंगनेर गावापासून अवघ्या १ किमी अंतरावरील पहाडी उतारावर ट्रॅक्टर पलटी झाली. यात ट्रॉलीखाली जयंत आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन मजूर जखमी झाल्याची माहिती आहे. 

घटनेची तक्रार गोडलवाही पोलिस मदत केंद्रात दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. वृत्त लिहिस्तोवर जखमी मजुरांची नावे कळली नाही. पुढील तपास गोडलवाही पोलिस करीत आहेत.