नक्षलवाद्यांनी जंगलात पेरलेले साहित्य पोलिसांनी केले जप्त

November 25,2020

गोंदिया : २५ नोव्हेंबर - महाराष्ट्र व छत्तीसगड पोलिसांनी राबविलेल्या नक्षल शोध मोहिमेतंर्गत २४ नोव्हेंबर रोजी छत्तीसगड राज्यातील गातापार पोलिस ठाण्यातंर्गत कहुआभरा जंगलात नक्षल साहित्य जप्त केले. 

राजनांदगावचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा, गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, देवरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी, राजनांदगाव पोलिस अधीक्षक डी. धवन, खैरागडचे विभागीय अधिकारी जी.सी.पाटी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ नोव्हेंबर रोजी गोंदिया व राजनांदगाव पोलिसांनी दोन्ही राज्याच्या सीमावर्ती जंगल परिसरात नक्षल शोध अभियान राबविले. यादरम्यान दुपारी १.३0 वाजता गातापार पोलिस ठाण्यातंर्गत येणार्या कहुआभरा जंगलात या पथकाला नक्षली साहित्य आढळले. यात एका प्लास्टिक ड्रममध्ये १ तोफा बंदूक, बंदुकीची नळी, १ नग एचपी ग्रेनेड बाह्य आवरण, विद्युत वायर ५ बंडल, १ नग सौर प्लेट, २३ नग बॅटरी, २४ टॉर्च, स्विचेस, सेलॉटॅप घटनास्थळी आढळले. पोलिसांनी हे नक्षली साहित्य जप्त केले आहे. 

ही कारवाई गोंदियाचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र भांडारकर, बोरतलावचे पोलिस निरीक्षक अब्दूल समीर, उपनिरीक्षक जितेंद्र डेहरिया, बीडीएसचे मनोज मेंढे, छत्तीसगड सुरक्षा दल आयटीबीपी, गोंदिया आणि राजनांदगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.