महिलेचा छळ करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह ८ जणांवर गुन्हा

November 25,2020

वाशीम : २५ नोव्हेंबर - घरबांधणीसाठी माहेरवरून ३ लाख रुपये आणण्याचा  तगादा लावून तिचा सतत शारीरीक छळ करणे तसेच पैसे न आणल्यामुळे पेटवून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना येथील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम वाळकी जहॉंगीर येथे घडली होती. 

तामसी येथील सदाशिव दत्तुजी लादे यांची मुलगी स्वाती हिचा विवाह १५ मे २0१५ रोजी वाळकी जहॉगीर येथील ज्ञानेश्वर तुळशीराम डव्हळे याच्यासोबत पार पडला होता. सुरुवातीचे काही दिवस तिच्या सासरच्या मंडळीने तिचा चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर पती ज्ञानेश्वर याने घर बांधण्यासाठी माहेरवरून तीन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. तसेच सासरा तुळशीराम गोपाळा डव्हळे, सासू कमल तुळशीराम डव्हळे तसेच पांडूरंग डव्हळे, नंदा डव्हळे, एकनाथ डव्हळे, सखुबाई डव्हळे व राणी डव्हळे या सर्वांनी तिचा क्षुल्लक कारणावरून शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. २१ ऑक्टोंबर २0२0 रोजी स्वातीला पेटवून दिले. यामध्ये गंभीररित्या भाजल्या गेल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचा उपचारादरम्यान २३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. आपल्या मुलीची हत्या पती ज्ञानेश्वर तसेच सासू सासर्यासह आठ जणांनी केली असल्याची तक्रार मृतक स्वातीचे पिता सदाशिव लादे यांनी दिली असून याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार शिपणे करीत आहेत.