लव्ह जिहाद विरोधातील अध्यादेशास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी

November 25,2020

लखनौ : २५ नोव्हेंबर - लव्ह जिहाद विरोधातील अध्यादेशास  उत्तर प्रदेश कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. काल  झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारित करण्यात आला. काही दिवसांअगोदरच या संदर्भात राज्याचे गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला होता.लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, महिलांच्या सन्मानाशी खेळणार्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा या अगोदरच दिलेला आहे.

अध्यादेशानुसार धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करणार्यास एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड असणार आहे. तसेच, अल्पवयीन व अनुसूचित जाती / जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी तीन ते दहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड असणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयाने दिला आहे. लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचे काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशारा देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.असे योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत बोलून दाखवले होते.