बेपत्ता बांधकाम व्यावसायिक पाषाणकर जयपूर येथे सापडले

November 25,2020

पुणे : २५ नोव्हेंबर - पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे अखेर महिनाभरानंतर सापडले. त्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जयपूर येथून सुखरूप ताब्यात घेतले आहे. २१ ऑक्टोबरला पाषाणकर हे शहरातून बेपत्ता झाले होते.

ऑटोमोबाइल क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबरला बेपत्ता झाले होते. ते हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली होती. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली एक सुसाईड नोटदेखील सापडली होती. ते गायब होण्यामागे काही राजकीय मंडळींचा हात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या मुलांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पाषाणकर हे बेपत्ता झाल्यानंतर गणेशखिंड रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात ते दिसून आले होते. त्यानंतर मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता.

गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात ते कोल्हापूर शहरात दिसून आल्याचे समोर आले होते. तेथील एका हॉटेलमध्ये ते राहिले असल्याची माहिती पुढे आली होती. याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले. त्यांनी पाषाणकर यांच्या कुटुंबाला ते दाखवले. ते पाषाणकर असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर कोल्हापूर येथे गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. पाषाणकर हे कोकणात गेले असावेत, अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके कोकणात देखील पोहोचली होती. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात येत होता.

दरम्यान, मंगळवारी पाषाणकर हे गुन्हे शाखेच्या पथकाला जयपूर येथे सापडले. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलिस निरीक्षक ताकवले यांना पाषाणकर यांच्याबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनिट १ च्या पथकाने दुपारी तीनच्या सुमारास जयपूर येथील एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुण्यात आणले जात आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांनी दिली.