तामिळनाडूत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

November 25,2020

चेन्नई : २५ नोव्हेंबर - देशात कोरोना व्हायरसचे संकट शमत नाही, तोच आणखीही काही संकटे डोकं वर काढत आहेत. त्यात नैसर्गिक संकटांची भर पडली आहे. आता तामिळनाडूमध्ये 'निवार' या चक्रीवादळासंदर्भात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी सर्व किनारी भागांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार बुधवारी कराईकल आणि मल्लापुरम या भागांवर धडकू शकते. ज्या पार्श्वभूमीवर ताशी १00 ते ११0 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. संबंधित भागांमध्ये तैनात असणार्या पथकांनी सर्व जबाबदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती काही अधिकार्यांनी दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये चेन्नईच्या किनारपट्टी भागात अनेक चक्रीवादळं धडकली आहेत. त्यामुळं त्याच धर्तीवर येणार्या निवार चक्रीवादळासाठीही आपण सर्वतोपरी तयारी करत असल्याचेही ते म्हणाले. 

बंगालच्या खाडी क्षेत्रावर तयार होणार्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर हे चक्रीवादळ निवारमध्ये परिवर्तित झालेलं आहे. इतकंच नव्हे, तर आता ते भयावह स्वरुपही धारण करु शकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ बुधवारी तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनार्यांवर धडकणार आहे. परिणामी पुढील चोवीस तासांचा कालावधी हा अधिक सावधगिरीचा असेल. बंगालच्या खाडी भागात तयार झालेलं हे वादळ तामिळनाडूच्या दिशेनं येत असून, सध्या ते पुदुच्चेरीपासून ४१0 किमी दक्षिणेकडे आहे. वादळाची एकंदर वाटचाल पाहता या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं चेम्बरमबक्कम आणि अशा अनेक जलाशयांवर प्रशासनांकडून नजर ठेवण्यात येत आहे.