४३ चिनी अँप्सवर केंद्र सरकारने घातली बंदी

November 25,2020

नवी दिल्ली : २५ नोव्हेंबर - उद्दाम चीनला दणके देण्याचे सत्र सुरूच ठेवताना केंद्र सरकारने मंगळवारी या देशाच्या आणखी ४३ ऍप्सवर बंदी जाहीर केली आहे. हे सर्वच ऍप्स भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे सरकारने हा निर्णय घेताना स्पष्ट केले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत या ऍप्सवर बंदी घालणारा आदेश जारी केला. या ऍप्सचे देशाच्या सुरक्षेवर कोणते परिणाम होऊ शकतात, याची सविस्तर माहिती मागविण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या आदेशात नमूद आहे.

या सर्वच ऍप्सचा चीनशी संबंध होता, असेही तपासात दिसून आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या ऍप्समध्ये अलिबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलिपे कॅशियर, कॅमकार्ड आणि वीडेट यासारख्या प्रमुख आणि लोकप्रिय ऍप्सचा समावेश आहे. याशिवाय, लालामूव्ह इंडिया डिलिव्हरी ऍप, ड्राईव्ह विथ लालामूव्ह इंडिया, स्नॅक व्हिडीओ, सोऊल, चायनीज सोशल, डेट इन आशिया, फ्री डेटिंग ऍप, ऍडोर ऍप, ट्र्यूली चायनिज, ट्र्यूली एशियन, चायनालव्ह, डेट माय एज, फस्ट विश, गाईज ओन्ली डेटिंग, ट्युबिट, वुईवर्कचिना, फर्स्ट लव्ह लिव्ह, रेला, कॅशियर वॉलेट, मँगोटीव्ही, एमजीटीव्ही, वुईटीव्ही, वुईटीव्ही लाईट, लकी लाईव्ह, टावबाओ लाईव्ह, डिंगटॉक, आयडेंटीवुई, इसोलॅण्ड २, बॉक्सस्टार, हिरोज, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, मंचकिन मॅच यासारख्या ऍप्सचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने यापूर्वी २९ जून रोजी चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी आणखी ११८ ऍप्सला देशातून हद्दपार केले होते. लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोर्यात उसळलेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने ही कठोर कारवाई केली होती. या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते.