कंगना रानवातला न्यायालयाचा दिलासा

November 25,2020

मुंबई : २५ नोव्हेंबर - राजद्रोह आणि इतर आरोपांमध्ये प्राथमिक माहिती अहवाल दाखल असला, तरी अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंदेलला अटक करण्यात येऊ नये, असा स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना दिला.

आम्ही तुम्हाला अटक होण्यापासून सुरक्षा कवच प्रदान करीत आहोत, पण ८ जानेवारी तुम्हाला चौकशीसाठी मुंबई पोलिसांपुढे हजर राहावेच लागणार आहे, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

कंगनाला पोलिसांनी आतापर्यंत तीनवेळा समन्स जारी केला, पण तिने उत्तर दिले नाही. सोमवारी तिने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी करताना न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने सुरक्षा कवच प्रदान केले.

तुम्हाला पोलिसांनी आतापर्यंत तीन समन्स जारी केले आहे. त्यांचा सन्मान करण्याची गरज होती, पण तुम्ही तसे केले नाही. कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हाच आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर कंगनाचे वकील म्हणाले की, दोन्ही बहिणी ८ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर होतील, याची हमी देतो. त्यांचे आश्वासन न्यायालयाने मान्य केले आणि त्यांना अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

कंगनाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याइतके हे प्रकरण खरोखरच गंभीर आहे का, असा सवाल उपस्थित करताना, या प्रकरणी सखोल सुनावणीची गरज असल्याने, त्यांना अटकेपासून दिलासा मिळायलाच हवा, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.