दिल्ली दंगल भडकवण्यासाठी ३०० दगडफेक करणाऱ्या महिलांना दिले पैसे

November 25,2020

नवी दिल्ली : २५ नोव्हेंबर - फेब्रुवारी  महिन्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलींच्या काळात जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदने दगडफेक करण्यासाठी सुमारे ३०० मुस्लिम आणि बंगाली भाषक महिलांना प्रचंड पैसे दिले होते. त्याच्या योजनेनुसार या महिला विविध भागांमध्ये रस्त्यावर उतरून पोलिसांवर दगडफेक करीत होत्या, असा खळबळजनक खुलासा दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून झाला आहे.

उमरला हे आंदोलन पेटवत ठेवायचे होते आणि त्यासाठी त्याने महिलांनाही सोबत घेतले होते. महिलांवर पोलिस बळाचा वापर करणार नाही, हे ओळखून त्याने हा कुटील डाव आखला होता. त्याला दंगली भडकविण्यासाठी विविध देशांमधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला होता, यातून त्याने या महिलांना पैसे वाटले होते. त्यांच्यासाठी दंगडांची व्यवस्थाही केली होती. या महिलांना दिल्लीच्या जहांगिरपुरी भागातून बसने जाफराबाद येथे आणले होते. या बसेसची, त्यांच्या प्रवासाची आणि जेवणाची व्यवस्थाही त्यानेच केली होती, असेही या आरोपपत्रात म्हटले आहे.

या महिलांना आधी शाहीनबागेत आणण्यात आले, तिथे हिंसाचाराची धग जास्त होती. तिथे त्यांना जेवण दिल्यानंतर बसने जाफराबादेत आणण्यात आले होते. चेहर्यावर बुरखा घालून या महिला पोलिसांवर दगडफेक करीत होत्या. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरात येऊनही त्यांची ओळख पटू शकली नाही. या दंगलीचा सूत्रधार उमरच होता आणि प्रत्येक हिंसाचाराची योजनाही तोच तयार करायचा, असेही यात नमूद आहे.