घ्या समजून राजे हो.....मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा....स्वप्न की वास्तव

November 20,2020

2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार अशी घोषणा महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. गेली 25 वर्ष महापालिकेत भगवा होता पण तो शिवसेना भाजप युतीचा,यावेळी फक्त भाजपचा शुद्ध भगवा फडकणार असे फडणवीसांनी सांगितल्यामुळे शिवसेना गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर फडणवीसांचे हे स्वप्न साकार होणे कितपत शक्य आहे यावरही राजकीय विश्‍लेषकांचे तर्क लावणे सुरु झाले आहे.

आज  या लेखातही फडणवीसांचे हे स्वप्न साकार होणे कितपत शक्य आहे आणि त्यात अडचणी काय येऊ शकतात यावरच ऊहापोह केला जाणार आहे. 1997 पासून 2017 पर्यंत मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती. 2017 मध्ये युती तुटल्याने दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. नंतर भाजपने शिवसेनेला विनाअट पाठिंबा देऊन टाकला त्यामुळे आजही मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता कायम आहे. मात्र 2022 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता दुरापास्त आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्यावर आणि  त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेसचे आवाहन देखील समोर असताना भाजप स्वबळावर सत्ता कशी आणू शकेल यावर विचार होणे गरजेचे आहे.

या संदर्भात विश्‍लेषण करायचे झाल्यास शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली. मुंबईतील मराठी माणसावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी संघटना म्हणून शिवसेना पुढे आली होती. त्या काळात भाजप नव्हता, मात्र भाजपचेच जुने रुप असलेला जनसंघ अस्तित्वात होता. जनसंघाचे त्या काळात मुंबईत चांगले काम होते. मात्र मुंबईतील अमराठी वर्ग हा जनसंघाच्या जास्त जवळ होता. शिवसेनेने मराठी माणूस हेच लक्ष्य ठेवले असल्यामुळे सुरुवातीला मराठी माणूस शिवसेनेच्या बाजूने उभा झाला. परिणामी 1968 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिवसनेने सुमारे 40 च्या आसपास जागा जिंकल्या होत्या. मराठी माणसाचेच नाव घेत शिवसेनेने 1970 मध्ये विधानसभेतही एक जागा जिंकली. 1973 च्या महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेनेला लक्षणीय यश मिळाले आणि शिवसैनिक असलेले सुधीर जोशी हे मुंबईचे पहिले महापौर बनले. तेव्हापासून मुंबई महापालिका कधी शिवसेनेकडे तर कधी काँग्रेसकडे अशी आलटूनपालटून राहत होती. याच काळात शिवसेनेतले दिग्गज नेते सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ  यांच्यासह काहीजण मुंबईचे महापौरही बनले.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखली जात होती. ईशान्यतील अनेक छोट्या राज्यांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पही मोठा असायचा. त्यामुळे मुंबई महापालिका ही राजकीय पक्षांसाठी दुभती गाय म्हणून ओळखली जात होती. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात पूर्वी राक्षसाचा, नव्हे राजाचा जीव पोपटात असायचा, तसा शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे अशा आशयाचे विधान केले ते याच कारणामुळे. मुंबई महापालिकेतील सत्ता हा शिवसेना विस्तारातील अर्थकारण सांभाळणारा प्रमुख स्त्रोत ठरला होता  असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

त्या काळात मुंबई महापालिकेत काँग्रेसचा जोर होता. त्या खालोखाल शिवसेना, नंतर आधीचा जनसंघ (1980 साली याच जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला होता.) समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष, डावे कम्युनिस्ट  यांचेही लक्षणीय अस्तित्व होते. असे बोलले जाते की मुंबईतील समाजवादी आणि डाव्यांचे अस्तित्व संपवण्यासाठी सुरुवातीच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि नंतरच्या काळात शरद पवार यांनी शिवसेनेला कायम पडद्यामागून ताकद देण्याचे काम केले होते. 1985 नंतरच्या काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले. तेव्हापासून ही युती कायम सत्तेवर प्रभाव टाकणारी ठरली. 1997 ते 2017 पर्यंत या युतीची मुंबई महापालिकेत सत्ता होती. अर्थात भाजप हा कायम कच्चालिंबू राहिला. सर्व सूत्रे ही शिवसेनेच्याच हातात राहिली.

शिवसेना-भाजप  युती 1995 मध्ये राज्यात सत्तेत आली त्यानंतर 1999 पासून शिवसेनेची राज्यातील ताकद हळूहळू कमी होतांनाच दिसून आली. परिणामी 2009 मध्ये विधानसभेत भाजप मोठा पक्ष बनला आणि शिवसेनेला धाकट्या भावाच्या भूमिकेत जावे लागले. 2014 मध्ये शिवसेना भाजप युती तुटली आणि स्वबळावर लढलेले दोन पक्ष निवडणूकीनंतर एकत्र आले. यावेळी या दोन्ही पक्षांची अवस्था तुझं माझं जमेेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी झाली होती. याचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने गेली पाच वर्षात घेतला आहे. नंतर 2019 मध्ये काय घडले हे सर्वश्रूतच आहे.

याच पार्श्‍वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप हे मुंबई महापालिकेत स्वतंत्ररित्या लढणार हे निश्‍चित आहे आणि याच परिस्थितीत शिवसेनेला हटवून भाजपला आपला भगवा मुंबई महापालिकेवर फडकवायचा आहे. फडणवीसांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना तर केली आणि त्याचबरोबर रणनीतिही आखली. मात्र आजच्या स्थितीत फडणवीस आणि त्यांची रणनीति कितपत यशस्वी होईल हाच खरा मुद्दा ठरणार आहे.

आज मुंबई महापालिकेत 234 नगरसेवक आहेत. (चूकभूल द्यावी घ्यावी) 2017 मध्ये शिवसेनेला स्वबळावर 84 जागा जिंकता आल्या होत्या. याचवेळी भाजपनेही 81 जागा जिंकत शिवसेनेचा वारू रोखण्याचे काम केले होते. या 165 जागा वगळता उर्वरित जागा काँग्रेस, मनसे  आणि अन्य पक्षांमध्ये वाटल्या गेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत त्यावेळी फारसे अस्तित्व नव्हते.

आता निवडणूका 2022 मध्ये आहेत. आज शिवसेना मुंबईसह राज्यात सत्तेवर आहे. त्याचवेळी भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशावेळी शिवसेना महापालिका आणि राज्य सरकार अशा दोन्ही शक्ती वापरून ही निवडणूक लढवेल यात शंका नाही. त्यामुळे भाजपला स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी बर्‍याच अडचणींना सामना करावा लागू शकतो.

असे असले तरी भाजपची आजची ताकद शिवसेनेसह कोणालाच दुर्लक्षिता येणार नाही. आज शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये आहेत. मात्र हे दोन्ही पक्ष निवडणूकीत साथ देतील का हा खरा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसने तर आताच आम्ही स्वबळावर महापालिका लढण्याची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसची ताकद दुर्लक्षिता येणार नाही. मुंबईत दलित आणि परप्रांतीय मोठ्या संख्येत आहेत. आज मुंबईत काँग्रेसचे नेतृत्व एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर अशा दलितांकडे दिलेले आहे.  त्याचवेळी आधीचा शिवसैनिक असलेला संजय निरुपम हा परप्रांतीय आज काँग्रेसच्या बाजूने शिवसेनेच्या विरोधात उभा आहे. हे मुद्दे शिवसेनेला आडवे येऊ शकतात.

त्याही पेक्षा शिवसेनेला आडवे येणार आहे ते त्यांचे हिंदूत्व. शिवसेनेने मराठी माणसाचा मुद्दा घेऊन स्वतःला उभे केले. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्याच्या आधाराने सत्ता मिळवली. आज मात्र सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्यांशी अभद्र युती केली आहे. यामुळे शिवसेनेचा हिंदुत्ववादी समर्थक मोठ्या प्रमाणात दुखावलेला आहे. हा शिवसेना समर्थक आज हिंंदुत्वाचा दुसरा सहारा शोधणार हे नक्की. अशा वेळी हा हिंदुत्ववादी मतदार भाजपची ताकद वाढवू शकतो हा धोका लक्षात घ्यायला हवा.

आजची भाजपची लढत ही एकाकी दिसत असली तरी ती एकाकी राहणार नाही हे नक्की. शिवसेनेशी उभे वैर धरणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यावेळी भाजपच्या सोबत राहू शकते. त्यामुळे शिवसेनेकडे जाणारा मराठी मतदार काही प्रमाणात मनसे फोडून भाजपची बाजू सुरक्षित करू शकते. त्याचप्रमाणे वंचित बहूजन आघाडी ही देखील भाजपसोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवले गट तर आधीपासून आहेच. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे वळणारी दलित मतेही भाजपच्या परड्यात पडू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस जर स्वतंत्रपणे लढली तर मुस्लिम मतदार राष्ट्रवादीच्या बाजूने जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सर्व मुद्दे कुठेतरी शिवसेनेला अडचणींचे ठरू शकतात हे नक्की.

शिवसेनेचे अर्थकारण मुंबई महापालिकेच्या जोरावर चालते असे बोलले जाते. त्यामुळे शिवसेनेवर भ्रष्टाचाराचेही बरेच आरोप होतात. शिवसेनेची महापालिकेत गेली 24 वर्ष सत्ता आहे मात्र तरीही जनसामान्यांच्या समस्या जशाच्या तशाच आहेत ती नाराजी मतदार कुठेतरी दाखवू शकतात. पाच वर्ष महाराष्ट्राची सत्ता सांभाळल्यामुळे भाजपजवळ त्याबाबतची बर्‍यापैकी माहिती उपलब्ध असणार हे नक्की. ती वापरून भाजप शिवसेनेला अडचणीत आणू शकतो. त्याला शिवसेना कसे तोंड देणार याचे उत्तर नजीकच्या काळात मिळेलच. आजही किरीट सोमय्या शिवसेनेचे रोज नवे कथित भ्रष्टाचार पुढे आणत आहेत. नजीकच्या काळात हे सर्व प्रकार वाढतील. यामुळे शिवसेनेची चांगलीच गोची होईल. यावेळी शिवसेनेचे आजचे साथीदार त्यांच्या मदतीला येतील की गंमत बघण्यात धन्यता मानतील त्यावर शिवसेनेचे यशापयश अवलंबून राहू शकते.

असे असले तरी भाजपला याचा फायदा मिळेल का हाही प्रश्‍न विचारात घ्यावा लागेल. शिवसेनेने गेल्या 50 वर्षात मुंबईत प्रत्येक गल्लीत आपल्या शाखा उभारल्या आणि आजही त्या शाखा अस्तित्वात आहेत. या शाखांच्या माध्यमातून आज शिवसेनेचा कार्यकर्ता मुंबईतल्या घराघरात पोहचला आहे.भाजपचेही मुंबईत नेटवर्क चांगले आहे. मात्र शिवसेने इतके तगडे नेटवर्क भाजपकडे नाही.  त्यामुळे भाजपला पुढील दीड वर्षात हे नेटवर्क उभे करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

यासाठी भाजपला फक्त त्यांच्या परंपरागत मतदारावर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना नवे मतदार मोठ्या संख्येत जोडावे लागणार आहे. शिवसेनेचा मुळचा मराठी मतदार मनसेच्या मदतीने फक्त फोडून चालणार नाही तर हा मतदार आपल्या बाजूने वळवण्याचे नियोजन भाजपला करावे लागेल.

त्यासाठी भाजपला काही नवे प्रयोग करावे लागतील. विशेष म्हणजे भाजपचा मुलाधार असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत भाजपला घ्यावी लागेल. संघाचे आज मुंबईत अतिशय चांगले नेटवर्क आहे. संघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने घराघरात पोहचणे भाजपला शक्य होईलही मात्र त्यासाठी संघालाही भाजपला विश्‍वासात घ्यावे लागेल. भाजप सत्तेत आल्यानंतर संघाच्या स्वयंसेवकांना योग्य तो मान दिला जात नाही अशी सर्वसाधारण तक्रार संघाच्या लहान स्वयंसेवकांपासून तर वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत सर्वचजण खासगीत करतात. हा गैरसमज आहे हे दाखवून संघ स्वयंसेवकांना नवा विश्‍वास देण्याचे काम भाजप नेत्यांना करावे लागेल. संघाची ही ताकद जर भाजपच्या बाजूने मुंबईत उभी राहिली तर भाजपला अपेक्षित लक्ष्य गाठणे अधिक सुकर होईल हे नक्की.

234 नगरसेवकांच्या महापालिकेत भाजपचा भगवा फडकावयाचा असेल तर भाजपला किमान 117 जागा मिळवणे गरजेचे आहे. 2017 मध्ये भाजपने स्वबळावर 81 जागा मिळवल्या होत्या. हा आकडा लक्षात घेता अजून 36 जागा मिळवणे भाजपला गरजेचे आहे. भाजप हे लक्ष्य कसे गाठू शकेल याचे उत्तर आपल्याला 2022 च्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात मिळेलच. फडणवीसांचे स्वप्न वास्तवात उतरेल काय हे त्याचवेळी आपल्याला कळेल तोपर्यंत आपण भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि समस्त भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊ या!

 

  तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क.ः घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/इश्रेससशीर्ईंळपरीहझरींहरज्ञ या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

                                                -अविनाश पाठक