जादूटोण्याच्या संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

November 17,2020

गोंदिया : १७ नोव्हेंबर - जादूटोण्याच्या संशयातून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातगाव  येथे रात्री ७ वाजतादरम्यान घडली. मृताचे नाव शामराव गोविंदराव नागरे (५०) रा. सातगाव असे आहे. 

मृत शामराव नागरे व आरोपी भीमराज तुकाराम हुकरे (५१) हे दोघेही मित्र होते. दोघेही नेहमी घर शिवने, फांद्या फोडणे, भजनात जाणे यासारखे कार्य सोबतीने करत होते.  परंतु शामराव नागरे हा भावाच्या पत्नीवर जादूटोणा करतो असा संशय भीमराज घेत होता. यासंदर्भात  गावात मीटिंगसुद्धा झाली होती. जादूटोण्याच्या संशयाचे भूत भीमराजच्या डोक्यात होते. यातूनच त्याने रविवारी शामरावला दारू पिण्यासाठी बोलावले. 

अंधार पडला असताना दोघेही गावाजवळ कालव्याला लागून असलेल्या उमराव भांडारकरांच्या शेतात दारू प्यायला बसले. भीमरावजवळ दारूचा पवव आणि फोरेट औषध होते. कदाचित फोरेट औषध दारूमध्ये मिसळून पाजण्याचा त्याचा अंदाज असावा. 

मात्र शामरावला लक्षात आले असावे त्यानंतर त्यांच्यात झटपट झाली. त्यातच भीमराजने शामरावच्या चेहऱ्यावर वजनी वस्तूने प्रहार केला. त्यामुळे त्याचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. 

नाकातोंडावर मर लागल्याने शामराव जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी व सालेकसा पोलिसांनी घटनास्थळ गाठले व शवविच्छेदन करण्यात आले. आरोपी भीमराज अटकेत असून पुढील चौकशी सुरु आहे.