उच्चशिक्षित तरुणाने केला नवीन फवारणी यंत्राचा यशस्वी प्रयोग

November 17,2020

अमरावती : १७ नोव्हेंबर - नवीन फवारणी पंपाचा प्रयोग चांदुर बाजार तालुक्यातील नझरपूर खेडेवजा गावातील अभिलाष शरद घोरमाडे या उच्चशिक्षित तरुण शेतकर्याने केला आहे. आपल्या देशात संशोधक बुद्धीच्या लोकांची काही कमरतात नाही. त्यातही जर शेतकरी असेल तर त्याच्या कल्पक बुद्धीने देशी जुगाड करून तयार केलेले शेती साहित्य, यंत्रे आपण नेहमीच पाहतो. असाच कमी खर्चात व शेतकर्याच्या फायद्याचा नवीन फवारणी पंपाचा प्रयोग अभिलाष घोरमाडे या तरुण शेतकर्याने केला आहे.

सर्वसाधारणत: पिकावर फवारणी पंपाच्या समोरील बाजूने हॅण्डलने केली जाते. परिणामी फवारणी पंपातील औषधाचे तुषार शेतकर्याच्या अंगावर उडत असल्याने शेतकरी विषारी औषधापासून चेहर्याचा बचाव करण्याकरिता मास्क व चष्म्याचा वापर करीत होता. परंतु हे उपाय कुचकामी ठरत होते. उलट पाहिल ेतर औषधामुळे चक्कर येणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, असे प्रकार झाले. मागील काही वर्षात तर फवारणी करताना अनेक शेतकर्याना जीव गमवावे लागले. या फवारणीच्या समस्येवर मात करण्याकरिता अभिलाष व त्यांच्या वडिलांच्या सशोधक बुद्धीने यावर उपाय शोधून फवारणी पंपात काही बदल घडवून पंपाच्या मागील बाजूस टर्काला दोन लोखंडी पट्ट्या जोडल्या व आडवी 5 सीएम सलाख जोडली. पुढील नळी काढून पंपाच्या मागील बाजूस नळ्या फिट केल्या. दोन 5 इंचीच्या नळ्या व टी च्या माध्यमातून त्या पंपाला जोडल्या. याचा एकूण खर्च मात्र 300 रुपये आला आहे. मागच्या बाजूला नळ्या असल्यामुळे जास्त श्रम न खर्च करता एकाच वेळी दोन ओळीत चांगल्या प्रकारे पिकात फवारणी करता येते. परिणामी शेतकर्याचे श्रम वेळ व पैसा सुद्धा वाचतो. अभिलाषने तयार केलेला सुरक्षित फवारणी पंप शेतकर्यांकरिता वरदान ठरत आहे. परिसरातील दूरवरचे शेतकरी फवारणी पंप पाहण्यासाठी अभिलाषच्या शेतात भेट देऊन त्याच्या नावीन्यपूर्ण कौशल्याची माहिती घेत स्वतःही हे फवारणी यंत्र तयार करून पंपाचा प्रयोग आपल्या शेतात करीत आहे.