घ्या समजून राजे हो..... बिहारच्या निकालांचा अन्वयार्थ

November 11,2020

गेले काही दिवस देशभर गाजत असलेल्या बिहार विधानसभा निवडणूकांचे निकाल आज पहाटे जाहीर झाले. देशभरातील सर्व पत्रपंडित आणि राजकीय विश्‍लेषकांचे अंदाज चुकवत पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये विजयी झाली असून नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होतील असे चित्र या क्षणी तरी दिसते आहे. याचबरोबर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि इतरत्र ज्या पोटनिवडणूका झाल्या त्यांचेही निकाल जाहीर झाले आहेत. इथेही सत्ताधारी भाजपने अपेक्षित आघाडी घेतलेली आहे. एकूणच देशात मोदीविरोधी लाट आहे हा देशभरातील राजकीय विचारवंत आणि विश्‍लेषकांचा दावा देशातील जनतेने खोटा ठरवला आहे आणि पुन्हा एकदा मतदार सुजाण झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

देशभरात बिहारच्या विधानसभा आणि मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांवरील पोटनिवडणूका याकडेच देशाचे खरे लक्ष लागले होते. कारण या निवडणूकांमध्ये सत्ताधार्‍यांना अपेक्षित निकाल लागले नसते तर दोन्ही ठिकाणी सत्तांतर अटळ होते. त्यामुळे या निकालावर देशभरातील राजकीय विश्‍लेषक आपल्या अटकळी बांधत होते. बहुतेक सर्वांनी बिहारमध्ये सत्तांतर होणारा आणि मध्यप्रदेशातही भाजपला सत्ता सोडावी लागणार असे अंदाज व्यक्त केले होते. या अटकळींच्या जोरावरच देशातील भाजपविरोधी पक्षांनी बिहारमध्ये महागटबंधन करीत एकत्रित निवडणूका लढवल्या होत्या. राज्यभर प्रचाराचा धुराळा उडवत बिहारमध्ये नितीशकुमार आणि राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी हे कसे अपयशी ठरले आहेत याचे चित्र उभे करण्यात विरोधक काहीसे  यशस्वी झाल्याचे  दिसत होते. देशातील प्रमुख माध्यमे विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे हीच री ओढत होते. एकूणच आता मोदी परवाचा र्‍हास होण्यास सुरुवात होते आहे असे मतदारांच्या मनावर ठासवण्याचा जोरदार प्रयत्न केला जात होता. प्रचारकाळात तर हे ठरवले गेलेच मात्र मतदानाचा अंतिम टप्पा आटोपल्यावर विविध वृत्तवाहिन्यांनी जे एकझिट पोलचे अंदाज वर्तवले ते अंदाजही बिहारमध्ये सत्तांतर होणार असाच दावा वारंवार करत होते. 

मात्र बिहार आणि मध्यप्रदेशचे मतदार या प्रचाराला भूलले नाही असे कालच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. एकझिट पोलमध्ये विविध मतदारसंघात काही निवडक व्यक्तींना तुम्ही कोणाला मत दिले असे विचारून त्यावर अंदाज लावण्याची पद्धत असते असे बोलले जाते. यावर समाजमाध्यमांवर आज एक इरसाल पोस्ट व्हायरल होते आहे. जो बिहारी कधी समोरच्या व्यक्तीला त्याने झुमका छाप तंबाखू खाल्ला की सूरजमुखी छाप याचाही थांग लागू देत नाही तो बिहारी आपले गुप्त असलेले मत कोणीतरी परक्या व्यक्तीला खरे सांगेल का असा प्रश्‍न या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे. एकूणच एकझिट पोलचे अंदाज लावण्याची आमच्या पत्रपंडितांची आणि निवडणूक विश्‍लेषकांची पद्धत किती चुकीची आहे हेच या पोस्टमधून स्पष्ट झालेले आहे.

या निकालाचे विश्‍लेषण करायचे झाल्यास देशातील मतदार आता सुजाण होत आहे असे ठामपणे सांगता येते. गेली अनेक वर्ष देशभरात जाती-पातीच्या आधारावर निवडणूकांचे राजकारण केले गेले. आजही तेच सुरु आहे. मात्र आता हा मतदार जातीच्या मर्यादा ओलांडून विकासाचे राजकारण होऊ शकते का याचा विचार करू लागला आहे हे कालच्या निकालांचे फलित मानता येईल. बिहारपुरते बोलायचे झाल्यास बिहारमध्ये मोठ्या संख्येत असलेला यादव समाज हा तेजस्वी यादव यांना साथ देईल आणि महागटबंधन विजयी करेल हा अंदाज लावला जात होता. मात्र मतदारांनी इथे तेजस्वी यादव यांना तोंडावर पाडले आहे. हाच प्रकार चिराग पासवान यांच्याबाबत झाला आहे. जातीच्या आधारावर मते मागून आपण पुढे जाऊ शकणार नाही हा धडा मतदारांनी त्यांना शिकवला आहे. विरोधकांनी प्रचारात नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, नीतीशकुमार , सुशीलकुमार मोदी यांच्या असंख्य चुका दाखवण्याचा निश्‍चित प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी या केंद्र आणि राज्यातील सत्ताधार्‍यांनी जी काही चांगली कामे केली होती त्याची दखल विरोधकांनी नाही तरी मतदारांनी निश्‍चित घेतली हे निकालांनी दाखवून दिले आहे. बिहारमध्ये गत 15 वर्षांपूर्वी जंगलराज असल्याचे बोलले जात होते. त्याकाळातले सत्ताधारी किंवा त्यांचे राजकीय वारस यांच्या हाती सत्ता सोपवण्यास जनतेने नकार दिला आहे.

असे असले तरी गेली 15 वर्षे सत्ता सांभाळणार्‍या जनता दल युनायटेड आणि त्यांचे नेते नितीशकुमार यांनाही मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. मोदी तुझसे बैर नहीं, नितीश तेरी खैर नहीं ही घोषणा निवडणूकीआधी काही माध्यमांनी ऐकवली होती. या घोषणेत तथ्य असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. आजवर बिहारमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या जदयूला मतदारांनी धाकट्या भावाची जागा दाखवून दिली आहे. 

आपल्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि हिेंदूत्ववादी विचारधारेचे समर्थक यांना कायम टिकेचे लक्ष्य केले गेले आहे. असे असले तरी या टिकाकारांच्या टिकांना बाजूला ठेवत हळूहळू देशतील मतदारांनी या विचारधारा प्रतिष्ठीत करण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये देशात प्रथमच भारतीय जनता पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक प्रचारक संपूर्णतः स्वबळावर देशाचा पंतप्रधान बनला. त्यानंतर भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यातील शक्य असलेली अनेक आश्‍वासने पूर्ण करण्यासही सुरुवात केली. त्यात नोटाबंदीसारखे काही धक्केही दिले. मात्र हे धक्के सहन करत आणि विरोधकांच्या जहरी प्रचाराकडे दुर्लक्ष करत अधिक घवघवीत यश 2019 मध्ये भाजपच्या पारड्यात टाकले. निवडणूक प्रचारात चौकीदार चोर है ही घोषणा देणार्‍यांनाच मतदारांनी चोरासारखे उभे राहण्यास बाध्य केले. असे असले तरी हे सर्व विरोधक अजूनही संपूर्ण ताकदनिशी नव्या बाटलीत जुनीच दारू भरून पुन्हा जनतेसमोर जातांना दिसतात मात्र जनता आता त्यांना दाद देणार नाही हे कालच्या निकालांनी स्पष्ट झाले आहे. आता विरोधकांना जर मोदी राजवट हटवून पुन्हा एकदा सत्तेत प्रतिष्ठीत व्हायचे असेल तर विकासाचे नवे मॉडेल जनतेसमोर आणावे लागेल आणि हे मॉडेल आम्ही पूर्ण शक्तीनिशी राबवू हा विश्‍वास (जो विश्‍वास विरोधकांनी आधीच गमनला आहे) निर्माण करावा लागेल. आता जातीची समीकरणे लावता येणार नाही. घोटाळे करुन सत्ता टिकवता येणार नाही. हेच कालच्या निकालांनी दाखवून दिले आहे.

कालच्या या निकालांचा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम निश्‍चित होऊ शकेल असा अंदाज आता राजकीय पत्रपंडित लावताना दिसत आहेत. त्यातील तथ्यही नाकारता येणार नाही. देशात आता उत्तरप्रदेश, पश्‍चिमबंगाल इथल्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यानंतरही काही निवडणूूका पुढे येत आहेतच. बिहारच्या या निकालांनी त्यात्या भागातील मतदारांकरिता एक संदेश जाणार आहे. आज पश्‍चिम बंगालमध्ये जे काही सुरु आहे ते थांबायला हवे असे सामान्य मतदाराचे मत निश्‍चित आहे. मात्र त्यांना तसा पर्याय मिळणे गरजेचे आहे. या निकालानंतर भाजप नेत्यांनी त्या त्या राज्यात नियोजनबद्ध कामगिरी  केली तर तिथेही चित्र बदलू शकेल असे दिसते आहे.

कालच्या निकालानंतर आता बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलणार काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र भाजपने तर आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप नितीशकुमारांना मुख्यमंत्री बनवेल असे आज तरी बोलले जाते. भाजपने आपल्या मतावर ठाम राहणे हेच आज राजकीय दृष्ट्या शहाणपण ठरेल. अर्थात भाजपचे वरिष्ठ नेते तितक्याच  सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील अशी सर्वसाधारण भाजप समर्थकांची अपेक्षा आहे.

बिहारच्या या निकालाचे महाराष्ट्रावरही परिणाम होऊ शकतात. बिहारच्या निवडणूका जाहीर झाल्यावर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील भाजपनेते  देवेंद्र फडणवीस यांना बिहारचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर भाजपला बिहारमध्ये मिळालेले लक्षणीय यश हे केंद्रीय स्तरावर फडणवीसांची बाजू भक्कम करणारे ठरले आहे. त्याचबरोबर भविष्यात पुढली काही वर्ष तरी या देशात मोदींना पर्याय नाही असा संदेश राज्यातील कुंपणावर बसलेल्या नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकेल असे अंदाज बांधले जात आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे एकूणच कालच्या निकालांचे देशाच्या राजकारणावर अत्यंत दूरगामी असे परिणाम होतील हे निश्‍चित. या निकालांनी आता जाती पातीचे राजकारण संपवा असा इशारा तर दिला आहेच पण त्याचबरोबर सत्तेसाठीची अनैतिक गटबंधने भविष्यात मतदार मान्य करणार नाहीत हे देखील संकेत दिले आहेत. हेच बोध या देशातील राजकारण्यांनी घेणे आता गरजेचे झाले आहे.

 

  तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....


ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BlogerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

                                               -अविनाश पाठक