नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या ६ मुलांचा बुडून मृत्यू

October 29,2020

विशाखापट्टणम : २९ ऑक्टोबर - नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 6 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी परिसरातून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी मुलं साधारण 15 ते 17 वयोगटातील असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व मुलं अंघोळीसाठी नदीवर गेली होती. घरातून मोठ्या उत्साहात नदीवर पोहायला गेली खरी पण पुन्हा ही पावलं घराकडे परतलीच नाहीत.

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी 6 युवकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण आहे. नदीवर अंघोळीला गेलेल्या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युवक अंघोळीसाठी नदीच्या पाण्यात उतरले आणि पोहत असताना मुसळधार पाऊस होऊ गेल्यानं नदीचं पाणी वाढलं होतं. त्यामुळे त्यांना देखील पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह खूप वेगात असल्यानं युवक बुडाले. काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेमध्ये 6 युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. 6 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत तर पुढील तपास सुरू आहे.