धुळ्यात पोलिसांनी उध्वस्त केला नकली नोटा छापण्याचा कारखाना

October 29,2020

धुळे : २९ ऑक्टोबर - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने  धुळ्यात सुमारे 48 हजारांच्या नकली नोटा जप्त केल्या तसेच शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील नोटा छपाईचा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरुन बनावट नोटा छपाईसाठी लागणार कागद, साई,संगणक, प्रिंटर असा एकूण 48 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.

नकली नोटा बनवण्याचं रॅकेट शिरपूरमध्ये कार्यरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे .पोलिसांची कारवाई सुरू असतांना आरोपींनी दोनशे रुपये दराच्या काही नकली नोटा जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जळालेल्या नोटांचे अवशेष देखील जप्त केले आहेत. कारखान्यात दोनशे रुपयाच्या नोटांची छपाई करण्यात येत होती. कारखान्यावर छापा टाकला असता आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.