शेतकऱ्याने केली मृत बैलाची दशक्रिया

October 29,2020

यवतमाळ : २९ ऑक्टोबर - शेतकऱ्याचं आपल्या जनावरांवर लेकरांसारखं प्रेम असतं. अगदी घरच्या सदस्यांप्रमाणं त्यांना वागणूक असते.यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याचा बैल आजारपणात वारला. तर त्या शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी पार पाडले. शेती, शेतकरी आणि बैल यांच्यात जिव्हाळ्याचे नाते असते. म्हणूनच या शेतकऱ्याने 15 वर्ष सोबत राहिलेल्या आणि त्याच्या भरवश्यावर प्रगती केल्यावर आता तोच जिव्हाळ्याचा साथीदार गमविल्यानंतर त्याच्या तेरवीचा कार्यक्रम केला आहे. शेतकरी आणि बैल यांचे अतूट आणि भावनिक नाते असते याचाच प्रत्यय यवतमाळमधील या घटनेनं आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील पिंप्रडवाडी गावातील कैलास राऊत यांच्या बैलाचं 17 तारखेला निधन झालं. कैलास राऊत यांच्याकडे स्वतःची शेती नाही मात्र ते अनेक वर्षांपासून दुसऱ्याची शेती बैलाच्या साहाय्याने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  त्यांच्या सोबत मागील 15 वर्षांपासून एक बैल  होता. त्याच बैलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यामुळं राऊत कुटुंबाला आपल्या घराचा एक सदस्य गेल्या सारखे दुःख झाले.  या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखे या बैलाचे दशक्रिया विधी पार पाडले.  बैलाची तेरवी करत विधिवत लोकांना जेवणही दिले.

15 वर्षांपासून या बैलानं घर चालवायला मदत केली. तो आमच्या घरातला सदस्य होता. त्याच्या जाण्यानं घरातला सदस्य गेल्यासारखं वाटत आहे. त्यामुळं त्याला असा निरोप दिला, असं कैलास राऊत यांनी सांगितलं.