महापौरांचे नव्या आयुक्तांशीही वाजले?

October 29,2020

नागपूर : २९ ऑक्टोबर - करोना काळात गेल्या पाच महिन्यात प्रशासन व पदाधिकारी यांच्यात दैनंदिन वाद उफाळल्याचे चित्र नागपूरकरांनी बघितले. आता नवे आयुक्तही जुन्या आयुक्तांप्रमाणे कडक धोरण अवलंबित आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये वाहन पार्किंगवरून आयुक्त महापौरांच्या चालकावर नाराज झालेत. ही बाब महापौरांच्या कानापर्यंत गेल्यानंतर संदीप जोशी यांनी बाजार समितीच्या बैठकीला जाण्याचे टाळल्याची जोरदार चर्चा आहे.

तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांचे वाहनही पोर्चऐवजी पार्किंगच्या ठिकाणी उभे रहायचे. आता नव्या आयुक्तांचे वाहनही तेथे उभे राहत नाही. मात्र, महापौरांच्या चालकांनी पोर्चमध्ये वाहन ठेवल्याने कार्यालयात येत असलेल्या आयुक्तांना अडचण झाली. त्यांनी चालकाची चांगलीच कानउघाडणी केली. यापुढे पोर्चमध्ये वाहन लावायचे नाही, असे बजावले. ही बाब कर्मचाऱ्यांनी महापौरांच्या कानावर घातली. त्यानंतर महापौरांनी त्यादिवशी बैठकीला जाण्याचे टाळले. गाडीच्या पार्किंगवरून रंगलेल्या वादाची चर्चा दोन दिवसानंतरही मनपात कायम आहे. याबाबत मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. काहींनी कानावर हात ठेवले. महापौर व आयुक्त दोघेही महत्वाचे आहेत. त्यामुळे या वादात अडकायचे नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, हा प्रकार घडल्याचे अनेकजण सांगतात. महापौर संदीप जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतरही एका ठरावावर महापौर व आयुक्त यांच्यात काही वाद झाल्याचे अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले होते. 

आयुक्त राधाकृष्णन बी. हे संयमी अधिकारी असले तरी कर्तव्यकठोर आहेत. ते अधिकाऱ्यांकडून कामे करवून घेण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत. करोना संक्रमणाच्या काळात काम करतानाच मनपाची आर्थिक परिस्थितीवरही त्यांची नजर आहे. माजी मुख्य वित्त व लेखाधिकारी हेमंत ठाकरे यांनाही त्यांनी एका बैठकीत चांगलेच खडसावले होते. काही नगरसेवकांना निधी नसल्याने कामे कशी होणार, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे. मुंढे यांच्या काळात प्रशासनात अधिक कठोरता होतील. त्याच दिशेने नवे आयुक्त काम करतील, याप्रकारचे हे संकेत आहेत