पंकजा मुंडेंनी केली शरद पवारांची तारीफ, रोहित पवारांनी केले पंकजांचे कौतुक

October 29,2020

मुंबई : २९ ऑक्टोबर - कोरोना संकटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे तसेच बैठका सुरू आहेत.  राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार साहेब, हॅट्स ऑफ कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले..पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणार्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणार्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.

शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत झालेल्या बैठकीत तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते.