कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव, नुकसानभरपाईची केली मागणी

October 29,2020

अमरावती : २९ ऑक्टोबर - तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे कपाशी या पिकांवर बोंडअळीचा प्रकोप होत असून पूर्णतः पिकांवर बोंडअळी निर्माण झाली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकर्यांनी बोंडअळीचा हार गळ्यात घालून प्रशासना समोर वर्हा सर्कलमध्ये कपाशी पिकावर 100 टक्के बोंडअळी निर्माण झाल्याने अन्नदाता शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मुंग, उडीद पीक हातचे गेले. उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती यावर्षी सोयाबीन पीकांची झाली. त्यातील नुकसानीची झळ कपाशीतून भरून काढू, या आशेवर असलेल्या वर्हा सर्कलमधील शेतकर्यांच्या कपाशी या पिकावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने आता जगावे कसे? हा प्रश्न या दुहेरी संकटामुळे निर्माण झाला आहे. ही व्यथा बुधवारी तिवसा तहसील कार्यालयावर धडकलेल्या शेतकर्यांनी मांडली. बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये 2 लाखावरील शेतकर्यांचे कर्ज देखील अद्याप माफ झालेले नसून ते कर्ज सुद्धा माफ करण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन शेतकर्यांनी तिवसा तहसीलचे नायब तहसीलदार दत्तात्रय पंधरे यांना दिले. यावेळी निरंजन कडू, दीपक तिखे, रावसाहेब देवघरे, विशाल खेरडे, साहेबराव होले, विजय माहोरे, निलेश होले, गजानन उमप, दिनेश उमप, विजय पाचघरे, विनोद दरेकर, नमीत बनसोड आदी शेतकरी उपस्थित होते.