राममंदिर हे नेत्रदीपक भारताचे प्रतीक - नितीन गडकरी

October 29,2020

नागपूर : २९ ऑक्टोबर - भारताचा नेत्रदीपक इतिहास, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे प्रतीक म्हणजे राममंदिर असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 साप्ताहिक विवेक तर्फे प्रकाशित ‘राममंदिर ते राष्ट्रमंदिर या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी हिंदुस्थान  प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले- हिंदु संस्कृती व भारतीय संस्कृती ही विस्तारवादी नाही. त्यामुळे राम मंदिर हा विषय सांप्रदायिक ठरू शकत नाही.

 समस्त विश्वाचे कल्याण व्हावे हा आमच्या संस्कृतीच्या विचारांचा नैसर्गिक स्वभाव आहे. समाज उन्नत करायचा असेल तर भूतकाळातल्या स्वाभिमानाच्या गोष्टी आहेत, त्या वर्तमान काळात आपल्या पिढीवर संस्कारित करणे गरजेचे आहे. तरच आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल ठरेल.

 राष्ट्र निर्माण या विषयावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले- परम वैभवशाली राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आपण जेवढी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत, ती सगळी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी मिशन मोडमध्ये काम करणे आवश्यक आहे. या विचारातून जनशक्ती उभी करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. भारताचा विकास, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासह अन्य विषयांवरही त्यांनी आपले विचार प्रकट केले.