जंगलातल्या युवराजांपासून सावध राहा - पंतप्रधानांचा घणाघात

October 29,2020

पाटणा : २९ ऑक्टोबर - जंगलराजच्या युवराजांपासून सावध राहा, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बिहारमधील दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटण्यात घेतलेल्या सभांमध्ये राजदचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर केला. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या 10 लाख सरकारी नोकर्यांच्या आश्वासनाचा देखील त्यांनी समाचार घेतला.

सध्या कोरोना महामारी सुरू असून, त्यातच बिहारला बिमारू बनवणार्या विरोधकांना सत्तेत आणण्यासाठी मतदान केल्यास राज्यच आजारी पडेल. या दोन शापांपासून दूर राहा, असा सावधगिरीचा इशारा त्यांनी या प्रचारसभेत दिला. हे लोक 10 लाख सरकारी नोकर्या देण्याचे आमिष दाखवत आहेत. मात्र, ते सत्तेत आल्यास बिहार खाजगी क्षेत्रातील रोजगारही गमवून बसेल. अपहरण करण्याचा अधिकार या पक्षाकडे आहे आणि हा पक्ष सत्तेत आल्यास खंडणी मागणे सुरू करेल. त्यामुळे कंपन्यांना आपले व्यवसाय बिहारमधून गुंडाळावे लागतील, असा आरोप त्यांनी केला.

 विरोधकांकडून पोकळ आश्वासने देण्याची ही पहिलीच वेळ नाही. बिहारला अंधारातून खेचून काढणार्यांना पुन्हा निवडून देण्याची संधी विधानसभा निवडणुकीद्वारे मिळाली आहे. जंगलराजचे युवराज विश्वसनीय आहेत का आणि राज्यातील कनिष्ठ व मध्यमवर्गीय नागरिकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा, असे त्यांनी सांगितले.

 नितीशकुमार यांनी बिहारला अंधारातून प्रकाशाकडे नेले तसेच अपहरणांचे पर्व संपुष्टात आणून राज्यात उद्योग आणले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. नितीशकुमार हे वर्तमानातील आणि भविष्यातीलही मु‘यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारने मागच्या दीड दशकात प्रगती केली. या कालावधीत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. माहिती व तंत्रज्ञानाचे केंद्र होऊन या राज्याने आणखी एक यश मिळवले आहे, असेही त्यांनी सांगितले.