एनआयए ने टाकले ९ ठिकाणी छापे, दहशतवादी कारवायांसाठी निधी दिला जात असल्याची शंका

October 29,2020

नवी दिल्ली : २९ ऑक्टोबर - स्वयंसेवी संघटनांकडून जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी कारवायांसाठी निधी दिला जात असल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने काश्मीर  खोर्यातील ९ आणि बंगळुरूत एका ठिकाणी छापेमारी केली, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

या छापेमारीत काही आक्षेपार्ह दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जप्त करण्यात आली, असे एनआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जम्मू-काश्मीर कोलिशन ऑफ सिव्हिल सोसायटीचे समन्वयक खुर्रम परवेझ, त्यांचे सहकारी परवेझ अहमद बुखारी, परवेझ अहमद मट्टा आणि बंगळुरू येथील स्वाती शेषाद्री आणि बेपत्ता व्यक्तींच्या पालक संघटनेचे अध्यक्ष परवीना अहंगर यांच्याकडे तसेच अथ्रौट आणि जीके ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांवर देखील छापेमारी करण्यात आली, असे या निवेदनात एनआयएने म्हटले आहे.

या कथित स्वयंसेवी संघटना धर्मदाय सेवेच्या नाkवाखाली देश-विदेशातून निधी उभारत असून, हा निधी जम्मू-काश्मिरातील फुटीरतावाद्यांना दिला जात आहे, असे एनआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. काही स्वयंसेवी संघटना कथित देणग्या आणि व्यवसाय योगदानाच्या नावाखाली देश-विदेशातून निधी उभारत असून, त्याचा वापर जम्मू-काश्मिरातील दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे. या प्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी भादंवि आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.