सुनेने सासूचा गळा आवळून केली हत्या

October 28,2020

वाशीम : २८ ऑक्टोबर - अडीच महिन्यांपूर्वी विवाह करून घरी आलेल्या सुनेने घरगुती कारणांवरून सतत भांडण होत असल्याने सासूचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना वाशीम तालुक्यातील ग्राम आडगाव खुर्द येथे घडली आहे. 

येथील ग्रामीण पोलीस अंतर्गत येत असलेल्या आडगाव खुर्द येथील जगन्नाथ उत्तमराव हजारे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जगन्नाथ यांचे मोठे भाऊ प्रदीप हजारे यांचा अडीच महिन्यांपूर्वी सुनीता (३५) हिच्यासोबत गंधर्व पद्धतीने विवाह झाला होता. परंतु विवाहानंतर सुनीता व त्यांची आई शोभाबाई उत्तमी हजारे (७०) यांच्यामध्ये घरगुती कारणांवरून सतत वाद होत होता. गत अडीच महिन्यांत त्यांच्यात अनेकदा वाद झाले. जगन्नाथ हे २३ ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. २४ ऑक्टोबरला सकाळी त्यांना त्यांची आई घराच्या बाहेरच्या अंगणात चेहऱ्याला व डोक्याला रक्त लागलेल्या अवस्थेत पडलेली असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळाली. ते गावी परत आले असता. गावातील लोकांनी त्यांच्या आईला घरात आणले होते. आई मृत अवस्थेत होती. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे तसेच गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे व्रण दिसून आले. आईची हत्या केल्याचे प्रथम निदर्शनास आल्याने या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनला सूचना करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. व तिला अटक केली. हत्येमागील अन्य कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.