५१ नक्षलप्रभावी गावात पोलिसांच्या पुढाकाराने साजरी होणार दिवाळी

October 28,2020

गोंदिया : २८ ऑक्टोबर - गोंदिया जिल्ह्यातील अनेक नक्षलग्रस्त गावांमध्ये आजही दिवाळीच्या दिव्यांची तेजोमय विचारसरणी पोहोचलीच नाही. त्यामुळे नकारात्मक भावनेपोटी आजही आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील नसल्याचे चित्र आहे. हे चित्र पुसून काढण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात यंदा नक्षलप्रभावी ५१ गावांतील आदिवासी बांधवांसोबत जिल्हावासियांच्या मदतीने वस्तुरूपी दिवाळीभेत देऊन प्रकाशाचा हा उत्सव साजरा करणार आहे. 

आदिवासींच्या मुलं-मुलींना रोजगाराच्या संधी, विविध प्रशिक्षण, शिक्षण, आरोग्य जनजागृती व शिबीर अशा अनेक उपक्रमांमुळे आदिवासी बांधव पोलीस प्रशासनाच्या विश्वासावर समाजात वावरू लागला आहे. याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून यंदाची दिवाळी १०हजार ९९६ आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. गडचिरोली गोंदिया परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. यानिमित्त आदिवासी बांधवांना वर्षभर पुरतील अशा दैनंदिन वस्तू , शैक्षणिक साहित्य, कपडे, क्रीडा साहित्य आदी वस्तू भेट देण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संघटनांसह इतर दानदात्यांचेही सहकार्य घेतले जात आहे.