आत्मनिर्भर भारत संकल्पनेत एमएसएमईची महत्वपूर्ण भूमिका - नितीन गडकरी

October 28,2020

नागपूर : २८ ऑक्टोबर - ‘एमएसएमई' हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन म्हणून देशातील सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांकडे पाहिले जाते. ११ कोटी रोजगार निर्मिती, ४८ टक्के निर्यात आणि ३० टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या एमएसएमईची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेत महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 वॉलमार्टच्या आभासी प्रशिक्षण व्यासपीठाच्या उद्घाटन प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी बोलत होते. हरियाणातील पानिपत येथे या व्यासपीठाचे उद्घाटन झाले असून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या प्रगतीत एमएसएमईची निर्यात ही महत्त्वाची बाब असून भारतीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग जागतिक पुरवठा मालिकेचा एक भाग आहे. भारतीय व्यापार उद्योग जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टीने वॉलमार्टचा महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच हे क्षेत्र वाढावे आणि उत्पादनाचा दर्जा सुधारावा यासाठीही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते असे सांगताना नितीन गडकरी यांनी वॉलमार्टचे अभिनंदन केले.

 भारतीय एमएसएमईसाठी वृध्दी पुरवठा विकास कार्यक्रम आणि आभासी प्रशिक्षण व्यासपीठ सुरु करून उद्योगांना प्रशिक्षित आणि त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ करण्याचे काम वॉलमार्टने केले आहे. या दोन्ही उपक्रमांचा उद्देश ५० हजार सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग पुढील पाच वर्षे जागतिक आणि स्थानिक पुरवठा मालिकांशी जोडले जातील हा असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले- कोविडच्या काळात उद्योगांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. संघर्षाला तोंड द्यावे लागले. यातून आता उद्योग सावरत आहेत. शासनाने सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसाठी काही योजना आणल्या तसेच ३ लाख कोटींचे पॅकेजही दिले आहे. या पॅकेजमुळे उद्योगांना पुन्हा उभे राहण्यास मदत होणार आहे. खेळते भांडवल उपलब्ध नसणे हे भारतीय उद्योगांसमोरील मोठे आव्हान आहे. ही समस्याही बर्याच प्रमाणात सोडवली जात आहे. यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. उद्योगांना देणे असलेली रक्कम लवकरात लवकर देण्याची व्यवस्था केली जात आहे, याकडेही नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले.