यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला स्थगिती देता येणार नाही - राज्य सरकारचे उच्च न्यायालयात शपथपत्र

October 28,2020

नागपूर : २८ ऑक्टोबर - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर  यांना सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारेच शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या शिक्षेमुळे यशोमती ठाकूर यांना अपरिवर्तनीय अशी कोणतीही हानी होणार असल्याचे अर्जात नमूद नाही त्यामुळे या शिक्षेला स्थगिती देता येणार नाही, असे राज्य सरकारने  न्यायालयात स्पष्ट केले . 

यशोमती  ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणातील दोष सिद्धीवर स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयास विनंती अर्ज केला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मागील गुरुवारी अंतरिम स्थगिती न्यायालयाने दिली होती. २0१२ मध्ये ठाकूर या आमदार असताना त्यांनी कर्तव्यावर असणार्या पोलिस शिपायाला मारहाण केल्याची नोंद आहे. याप्रकरणी अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात पोलिस शिपायाने तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी आ. ठाकूर व त्यांच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. येथे यशोमती ठाकूर यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना तीन महिने सर्शम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला ना. ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. त्यावर मागील गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली होती.मात्र त्यांनी दोष सिद्धतेवर स्टेसाठी न्यायालयास विनंती केली आहे.