मुस्लिम मुलीबरोबर मैत्री केल्याने तरुणाला गमवावे लागले प्राण

October 17,2020

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : ईशान्य दिल्लीतल्या आदर्शनगर येथील मुस्लिम मुलीसोबत मैत्री केल्याने काही मुस्लिम तरुणांनी दिल्ली विद्यापीठात पत्रकारितेचा विद्यार्थी राहूल राजपूत याची हत्या केली आहे. दोन वर्षांपूर्वी याच कारणासाठी अंकित सक्सेना नावाच्या विद्यार्थ्याची देखील हत्या करण्यात आली होती.

राहूलची त्याच परिसरात राहणार्‍या एका मुस्लिम मुलीसोबत मैत्री होती. तिच्या कुटुंबियांचा या मैत्रीला विरोध होता. बुधवारी सायंकाळी मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना सोबत पाहिले. त्यांनी त्याला भूलथापा देऊन नंदा मार्ग येथे बोलावले. तिथे पोहोचलेल्या राहुलवर मुलीच्या भावासह तीन ते चार जणांनी हल्ला केला. हल्लेखोरांमध्ये मोहम्मद अफरोझ, मोहम्मंद राज आणि इतर तीन जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. हल्लेखोरांपासून राहूलचा बचाव करताना त्याची मैत्रीण दिसली. आपल्या पुतण्याची दोन वर्षांपासून मुस्लिम मुलीसोबत ओळख होती. ती आमच्याच परिसरात राहते, पण तिचे कुटुंबीय विशेेषतः तिचा भाऊ या मैत्रीच्या विरोधात होता. असे बयाण राहुलच्या काकांनी पोलिसांना दिले आहे. राहुलचा चार ते पाच जण मारहाण करीत असल्याचा दूरध्वनी मला आला होता. घटनास्थळी पोहोचलो, त्यावेळी मुलीचा भाऊ आणि त्याचे साथीदार राहुलला अत्यंत क्रूरपणे मारहाण करीत असल्याचे दिसले. असेही त्याच्या काकांनी बयाणात म्हटले आहे. आरोपींनी राहुलला यापूर्वीही जिवे मारण्याची धमकी दिली होती. शरीर जोरदार ठणकत असल्याची तक्रार राहूलने केली. त्याला दिसतही नव्हते. उलट्या होत होत्या. रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसल्या नाहीत. प्लिहा फुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. अशी माहिती ईशान्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त विजयंता आर्य यांनी सांगितले.