मतिमंद मुलीवर अत्याचार करणार्‍याला न्यायालयाने ठोठावला कारावास

October 17,2020

गडचिरोली, 17 ऑक्टोबर : घरी एकटीच बघून एका अल्पवयीन मतिमंद अपंग मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षाचा कारावास व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संजय बाकडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ही आपल्या अंगणात एकटीच बसली असताना संजय वाकडे तिच्याजवळ गेला. त्यानंतर तिला तिच्या काकाच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने पीडितेची आजी घरी आली असता तिला ती रडताना दिसली. शिवाय आरोपी तिच्यावर अतिप्रसंग करीत असल्याचे दिसून आले. पीडित मुलीची आई शेतावरून परतल्यानंतर तिने आरमोरी पोलिस ठाण्यात 2 सप्टेंबर 2018 रोजी तक्रार नोंदविली होती. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय वाकडे  यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल राणे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राणे यांनी आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी संजय वाकडे यास 15 वर्षाचा कारवास व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच पीडित मुलीस 55 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेशही पारित केला.