अंबाझरी तलावाजवळील मलबा तातडीने हटवा - महापौरांचे मेट्रोला निर्देश

October 16,2020

नागपूर : १६ ऑक्टोबर - अंबाझरी तलाव आणि विवेकानंद स्मारक हे नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारे स्थळ आहेत. मात्र, त्या स्थळाजवळच मेट्रो रेले कॉर्पोरेशनने बांधकामादरम्यान उपसण्यात आलेला मलबा टाकल्याने दोन्ही स्थळे विद्रुप दिसू लागले आहे. शिवाय हा मलबा तलावासाठी धोकादायक ठरु शकतो. हे लक्षात घेता मेट्रोने तातडीने मलबा हटवावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

 महापौर संदीप जोशी यांनी आज  सकाळी अंबाझरी तलावाच्या विवेकानंद स्मारक ओव्हरफ्लो पॉईंट जवळील बंधाऱ्याची भिंतीचे‍ निरीक्षण केले. हा फार जुना बंधारा असून भिंतीची अवस्था जीर्ण झाली आहे. अशात त्या बंधाऱ्याला तडा जाऊ नये, त्याला धोका पोहचू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. असे असतानाही मेट्रोने बांधकामादरम्यान निघालेली माती तेथे टाकली. यावर नाराजी व्यक्त करीत ती माती तात्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले. बंधाऱ्याची अवस्था लक्षात घेता सिंचन विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती तात्काळ करावी, असेही निर्देश त्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या महत्त्वाच्या विषयावर मेट्रो, सिंचन विभाग व मनपाची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.  

यासंदर्भात मनपाच्या सार्वजनिक अभियंत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले की बंधारा दुरुस्तीबाबत सिंचन विभागाला सूचना देण्यात आली आहे. दुरुस्तीसाठी मेट्रोकडून मनपाला एक कोटी रुपये प्राप्त झाले आहे. ही रक्कम सिंचन विभागाकडे वळती करण्यात आल्याची माहितीही अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी दिली.

तलावानजिक टाकलेली माती तातडीने हटविण्यासाठी मेट्रोला तातडीने पत्र देण्याचे निर्देश देतानाच सिंचन विभागाने अंबाझरी तलावाला सुस्थितीत ठेवण्यासाठी लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मेट्रोमुळे अंबाझरी तलावाला धोका पोहोचेल, अशा आशयाची कोणतीही तक्रार येता कामा नये, असेही ते म्हणाले. याबाबत तीनही विभागाच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.