गरबा, दांडिया ऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजित करा - जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर -   नवरात्रौत्सव, दुर्गा पूजा तसेच दसरा सण साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

कोरोनामुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हयात नवरात्रौत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा न करता अत्यंत साध्या पध्दतीने घरगुती किंवा वैयक्तिक स्वरुपात साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंडप उभारण्यात यावे. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती मुर्तीसाठी 2 फूटाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पारंपारिक मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. शाळूची पर्यावरणपूरक मुर्ती असल्यास शक्यतो घरी अथवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जनास्थळी प्रशासनाशी समन्वय ठेवून विसर्जन करावे.