अकोला महापालिकेची सभा गाजली

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - अकोला महानगरपालिकेत गेल्या सभेत 22 पैकी बारा वेळेवरच्या विषयावर चर्चा करु नका या एकमेव कारणावरुन आज महापालिकेची महासभा गोंधळात पार पडली. शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांनी नगर सचिव यांच्या समोरील अंजेडाची फाईल हिसकावल्यानंतर महापौर अर्चना मसने यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचले आणि ते मंजुर केल्यानंतर जिल्हा नियोजन भवनातील महासभा संपली. नगरसेवकांनी कोरोना काळात परस्परातील अंतर देखील यावेळी पाळल्याचे चित्र नव्हते.

गेल्या सभेत 22 पैकी 12 वेळेवरच्या विषयावर विजय मंजुरीच्या वेळी सभागृहात शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांनी चर्चा सुरु केली. गेल्या सभेतील विषयावर या सभेत चर्चा करता येत नाही असे भाजपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व वंचितच्या सदस्यांनी सभेत गोंधळ घातला. हा गोंधळ एकीकडे सुरु असताना शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा यांनी नगर सचिव यांच्या समोरील विषय पत्रिका व रजिस्टर हे ओढून घेत ते सभागृहात स्वतःच्या ताब्यात ठेवले. या सर्व गदारोळात भाजपा सदस्यांनी महापौरांना संरक्षण दिले. त्याच बरोबर दादागिरी करणार्या. शिवसेना नगरसेवकांना चांगलेच सुनावले. भाजपा स्विकृत सदस्य गिरीश जोशी यांची मोलाची भूमिका आज सभेत होती. त्यांच्या मदतीला इतर ही सदस्य या वेळी धावून आले.

 गेल्या सभेत वेळेवरच्या 22 विषयांपैकी 12 विषयांवर कुठलिच चर्चा झाली नव्हती. ती चर्चा आज या सभेत करण्यात येत होती. यात 70 कोटी रुपयांच्या विविध विषयांची माहिती दडलेली आहे. त्यामुळे त्यावर चर्चा महासभेत करण्याची मागणी शिवसेनेची असल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. यात भाजपाने काही काळेबेरे केले नसेल तर चर्चेला भाजपाचा विरोध का असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक गजानन चव्हाण यांनी उपस्थित केला. पण, गेल्या सभेतील मंजुर विषयावर या सभेत चर्चा नको असे भाजपा नेते विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी गोंधळ घातला. त्यांना काँग्रेस व वंचितच्या सदस्यांनी साथ दिली. त्यामुळे सभागृहातील वातावरण गरम झाले होते.