चंद्रपूरमधील दारूबंदी हटवण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची चर्चा

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - विदर्भातील  चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याबाबत हालचालींना पुन्हा एकदा वेग आलाय. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा चंद्रपूरमध्ये जोरदार सुरु आहे. या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे. 

चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दारूबंदीबाबत आज  मुंबईत बैठक झाली. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आग्रहास्तव ही बैठक बोलावली होती. 5 वर्षात दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूची विक्री वाढली, बनावट दारूने मृत्यू ओढवल्याची आणि दारुबंदी काळात गुन्हेगारीत वाढ झाल्याची खुद्द पालकमंत्र्यांनी कबुली दिली. या सर्वांवर उपाय म्हणून त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना 27 ऑगस्टला पत्र लिहून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे आजवर चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याचीच मागणी होत असताना वडेट्टीवार यांनी त्यात राजकीय चातुर्याने गडचिरोलीचाही उल्लेख केला.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदीचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचं काय होणार यावर महाआघाडी सरकार येताच मोठी चर्चा सुरु झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचे फायदे आणि तोटे याचा अभ्यास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समीक्षा समितीने 16 मार्च 2020 ला पालकमंत्र्यांना दारूबंदी समीक्षा समितीचा अहवाल सादर केला आणि दारूबंदी विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या. पण अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाने या साऱ्या प्रक्रियेला ब्रेक लावला. पण आता दारूबंदी उठवण्याची मोहीम पुन्हा एकदा वडेट्टीवार यांच्या अजेंड्यावर आली आहे.