नागपूरच्या गंगाजमुना रेडलाईट वस्तीतही ड्रग तस्करांचा प्रवेश

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या वारांगनांच्या गंगाजमुना वस्तीत ड्रग्स तस्करांनी प्रवेश केला असुन अनेक दलाल तेथील युवतींना ड्रग्स देऊन देहव्यापार करण्यास बाध्य करीत आहेत. तसेच गंगाजमुनातील अनेक युवती ड्रग्सच्या आहारी गेल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाजमुना वस्तीत सध्या जवळप ४ हजार वारांगना देहव्यापार करतात. यामध्ये ७० टक्के वारांगना १८ ते ३५ वयोगटातील आहेत. तसेच जवळपास ४० ते ४५ अल्पवयीन मुलींचा समावेश असून त्यांचे वय १३ ते १७ वर्ष आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गंगाजमुनातील २० दलाल ड्रग्स तस्करांच्या संपर्कात असून याकडे लकडगंज पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. सचिन उर्फ वकिल्या, इंगा, मनोज, वाहिद, पहेलवान आणि बंटी हे गंगाजमुनात एमडी पोहचविण्याचे काम करतात. 

काश्मिरी गल्लीतील अल्पवयीन मुलींना सचिन बळजबरीने ड्रग्स देत असून गंगाजमुनातील अनेक तरुणींना त्याने ड्रग्सच्या दलदलीत ढकलले आहे. अनेकींना आता एमडी ड्रग्सची लत लागली आहे. नशा देऊन त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

गंगाजमुनातील दलाल सचिन याने लकडगंज पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सेट केले आहेत. त्यामुळे सचिनकडे असलेल्या वारांगनांना पोलिसांचे संरक्षण आहे. वस्तीत सचिनची रंगदारी असून काम करण्यास नकार देणाऱ्या तरुणींना मारहाण करणे तसेच वस्तीतील युवकांना दमदाटी करून मारहाण करण्याचे प्रकार तो करत असल्याची चर्चा आहे.