दोन दिवसात झिरो माईल परिसराची स्वछता करा - उच्च न्यायालयाचे आदेश

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन दिवसात झिरो माइलची स्वच्छता करा आणि त्याच्या देखभालीची सोय लावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने  दिले. 

शहराची ओळख असलेल्या झिरो माइलची दुरावस्था बघून हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करवून घेतली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने अँड. कार्तिक शुकुल यांना न्यायालय मित्र म्हणून नियुक्त केले आहे. मंगळवारी न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्यापुढे या याचिकेची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मेट्रोला या स्मारकाची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. मेट्रोने कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन दिवसात झिरो माइलची स्वच्छता करावी आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी, असे आदेश कोर्टाने दिले. 

झिरो माइलची मालकी नेमकी कुणाकडे आहे आणि त्याची देखभाल कुणी करावी यावर माहिती देताना अॅड. शुकुल यांनी सरकारी कागदपत्रांचे दाखले दिले. राज्य सरकारने काढलेल्या एका सूचनेनुसार हे स्मारक राज्य सरकारच्या अखत्यारित येते. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान या परिसरातील वाहतुकीच्या मुद्द्यावरही चर्चा झाली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने एक अहवाल तयार करून तो हायकोर्टापुढे सादर करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप उपायुक्तांनी हा अहवाल सादर केलेला नसल्याचे अॅड. शुकुल यांनी कोर्टाला सांगितले. यावर उपायुक्तांनी ७ ऑक्टोबरपर्यंत हा अहवाल सादर करावा असे आदेश हायकोर्टाने दिलेत.