ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीने केली आत्महत्या

September 30,2020

सातारा : ३० सप्टेंबर - ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याच्या नैराश्यातून दहावीतील विद्यार्थिनीने राहत्या घरातील लाकडी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराड तालुक्यातील ओंड गावात घडली आहे. साक्षी आबासाहेब पोळ (वय 15) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलीचे नाव असून या घटनेची नोेंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

कराड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंड गावातील साक्षी आबासाहेब पोळ ही मुलगी इयत्ता दहावीत शिकत आहे. कोरोनामुळे शाळांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, साक्षीच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. तिचे पितृछत्र हरपले आहे. आई मोलमजुरी करते. यामुळे तिच्याकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल नाही. गेल्या काही दिवसांपासून साक्षी आईकडे मोबाईलची मागणी करत होती. मात्र, पैसे नसल्यामुळे नंतर मोबाईल घेऊ, असे आईने तिला सांगितले होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी चार महिन्यापासून साक्षी शेजार्यांकडे आणि तिच्या मैत्रिणींकडे अभ्यासासाठी जात होती. दररोज मोबाईलसाठी इतरांच्या घरी जावे लागत असल्याने साक्षी वैतागली होती. 

आई रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी गेल्यानंतर साक्षीने राहत्या घरात गळफास घेतला. आई सर्व कामे आटोपून मोलमजुरीसाठी शेतात गेली. शेतातून तिच्या आईने शेजारच्या एका मुलीला फोन करून साक्षीला शेतात पाठवून देण्याचा निरोप दिला. साक्षीला आईचा निरोप देण्यासाठी शेजारील मुलगी साक्षीच्या घरी गेली. तेव्हा साक्षीने गळफास घेतल्याचे तिला दिसले. तिने आरडाओरडा करत आजुबाजूच्या लोकांना जमा केले. लोकांनी साक्षीचा मृतदेह खाली काढला. 

दरम्यान, घटनेची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना मिळाली तेव्हा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मृत साक्षीची आई स्वाती आबासाहेब पोळ यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घटनेची नोंद झाली आहे.