सहमती नाही म्हणून आम्ही घर तोडणार नाही - न्यायमूर्तींची संजय राऊतांना कानपिचक्या

September 30,2020

मुंबई : ३० सप्टेंबर - अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई आणि महाराष्ट्राबाबत जे वक्तव्य केले त्याबाबत आम्हीही समहत नाही. आम्हीही महाराष्ट्रीय आहोत आणि आम्हाला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे. परंतु तिच्या वक्तव्यावर सहमत नाही म्हणून आम्ही काही तिचे घर तोडायला जाणार नाही, असे सुनावत, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाच्या वक्तव्यावर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ‘कानून क्या है?’, अशा केलेल्या विधानाबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

राऊत हे खासदार आणि नेते आहेत, परंतु त्यांची प्रतिक्रिया ही खासदाराला शोभणारी आहे का, अशा प्रकारे व्यक्त होतात का, असा प्रश्नही न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने केला. राऊत यांनी त्यांच्या पदाचे भान ठेवून जबाबदारीने व्यक्त व्हायला हवे होते. त्यांनी कंगनाच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून उदारता दाखवायला हवी होती, असेही न्यायालयाने म्हटले.

बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामावरील पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कंगनाच्या वक्तव्यावर राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली.

कंगनाच्या आरोपांबाबत राऊत यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करत सगळ्या आरोपांचे खंडन केले.

कंगनातर्फे कथित बेकायदा बांधकाम केले जात होते त्या वेळी कारवाई का केली नाही, कारवाईसाठी ५ सप्टेंबपर्यंतची वाट का पाहिली, त्या वेळी तुमच्या अधिकाऱ्यांनी काणाडोळा का केला, असे सुनावत न्यायालयाने पालिकेच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.