कालवा फुटल्याने गाव झाले जलयुक्त

September 30,2020

भंडारा : ३० सप्टेंबर -  तिरोडा तालुक्यातील न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या रिसाळा तलावातील पाणी कालव्याद्वारे करडी परिसरात वाटप केले जाते. परंतु  सदर कालवा फुटल्याने पांजरा (बोरी) गाव जलमय झाले आहे. कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाणी शिरल्याने शेतशिवार जलमय झाले आहेत. घरे कमकुवत झाली आहेत. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

रिसाळा कालव्याद्वारे करडी परीसरात पाणी वाटप केले जाते. दरवर्षी तलाव अपूर्ण भरत असल्याने करडी पयर्ंत कसेतरी पाणी पोहचून शेतीला मिळत असे. बर्याचदा पांजरा (बोरी) शिवारात पाणी येत नव्हते. परंतु यावर्षी पाऊस समाधानकारक पडल्याने रिसाळा तलाव ओवरफ्लो झाले असल्याने पांजरा (बोरी) शिवारात शेतीला पाणी देण्यात आले. मात्र, पांजरा (बोरी) जवळील कालवा पाण्याच्या प्रवाहाने फुटल्याने गावात पाणी शिरून घरामध्ये पाणी शिरले आहे. पांजरा येथील गांधी चौक व बंडू राऊत व इतरांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागामार्फत पाणी वाटप कर्मचारी नियुक्त असुनही त्यांचे कडून दुर्लक्ष केले गेले. वेळेपूर्वी कालव्याची पाहणी व दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी कमकुवत ठिकाणाहून कालवा फुटल्याने शेतशिवारातील पिकांचे व नागरिकांचे नुकसान झाले