फार्मा कंपन्यांच्या विरोधात आयकर विभाग उच्च न्यायालयात

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - डॉक्टरांना देण्यात येणार्या गिफ्टचा खर्च कोट्यवधी दाखवून आयकरात सवलत मागणार्या फार्मा कंपन्यांच्या विरोधात आयकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. आयकर विभागाविरुद्ध मेसर्स गोल्डमाईन फार्मा प्रा. लि. कंपनीच्या या प्रकरणात आयकर विभागाची बाजू ऐकून घेत न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली असून, आठ आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

आयकर विभागाच्या माहितीनुसार डॉक्टरांना देण्यात येणार्या गिफ्टचा खर्च ३ कोटी इतका दाखवित नागपूर स्थित कंपनीने आयकरात सवलत मागितली. तर विभागाने त्यांना आयकर भरण्यास सांगितले. हा वाद प्राधिकरणात गेला. त्यानंतर आता न्यायालयात पोहोचला आहे. आयकर विभागाच्या वतीने अँड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या परिपत्रकानुसार फार्मा कंपन्यांतर्फे डॉक्टरांना देण्यात येणारे गिफ्ट हे वैद्यक परिषदेच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन आहे. परिषदेने डॉक्टरांना अशाप्रकारे गिफ्ट घेण्यास प्रतिबंध केला आहे. आयकर अधिनियमातील कलम ३७ (१) नुसार चिकित्सकांनाही गिफ्टवर आयकर भरावा लागतो. मात्र, गिफ्ट देणार्या कंपनीकडून आयकर घ्यावा की नाही, यावर सारा वाद आहे. फार्मा कंपनीने ३ कोटींच्या खर्चावर आयकर सवलत मागितली आहे. यापूर्वी कंपनीने आयकर अपील प्राधिकरणातही धाव घेतली होती. प्राधिकरणाने कंपनीला ३ कोटींच्या रकमेवर आयकर सूट देण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात आयकर विभागाने उच्च न्यायालयात धाव घेतली.