अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांनी पळवून लावले

September 30,2020

नागपूर: ३० सप्टेंबर -  मंगळवारी झोनअंतर्गत येणार्या बगदादीनगर येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर येथील अनधिकृत घरांचे बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या अतिक्रमणविरोधी पथकाला नागरिकांच्या जमावाने विरोध केला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

सतरंजीपुरा बडी मस्जिद कमिटीची बगदादीनगर येथे १६ एकर जमीन आहे. या जागेवर २८८ प्लॉट पाडण्यात आले. मात्र, कुठलीही परवानगी न घेता यातील १३४ प्लॉटवर लोकांनी घरे उभारली. याच परिसरात कुख्यात गुंड साहिल सय्यद याचादेखील बंगला होता. महापालिकेच्या पथकाने गेल्या महिन्यात त्याचा बंगला तोडला होता. या कारवाईदरम्यान या भागात तब्बल १३४ घरांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे दिसून आले. त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली होती. मनपा वा नासुप्रची मंजुरी न घेता अनधिकृत घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. ते तोडण्यासाठी मंगळवारी अतिक्रमणविरोधी पथक असता नागरिकांनी कारवाईला विरोध केला. ७00 ते ८00 लोकांच्या जमावाने कारवाईला विरोध केल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. येथे मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली. स्वत: विकास ठाकरे हे बगदादीनगर येथे आले. कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली. तुर्तास कारवाई टळली. झिंगाबाई टाकळी येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संजय भिलकर, सुभाष मानमोडे, पापाजी शिवपेठ, अज्जू खान, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, जगदीश गमे, संजय मांगे, निखिल कापसे, आशिष गायकवाड, योगेश पेठे, अजय गोडबोले आदी यावेळी उपस्थित होते.