राहुल गांधींनी चढवला मोदी सरकारवर हल्लाबोल

September 30,2020

नवी दिल्ली : ३० सप्टेंबर - केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र यानंतर आता राहुल गांधी यांनी शेतकर्यांशी दिल की बात च्या माध्यमातून संवाद साधला आहे. शेतकर्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल असे त्यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी शेतकर्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शेतकर्यांनी आवाज उठवल्याने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले आणि आज पुन्हा एकदा शेतकर्यांच्या आवाजाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेल असे राहुल यांनी म्हटले आहे. शेतकर्यांशी केलेल्या चचेर्चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक छोटा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच आपल्या थाळीत अन्न देण्यास शेतकरी विसरत नाहीत. मग त्यांना आपण कसे विसरू शकतो. ते आपल्यासाठी पीक उगवतात आणि आपण त्यांच्यासाठी आवाज उठवू नये?, राहुल गांधींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अन्नदात्याचा हा आवाज ऐका, असे ट्वीट पुनिया यांनी केले आहे. शेतकर्यांना राहुल गांधींनी एमएसपी संपुष्टात येईल का? असा प्रश्न विचारला आहे. कृषी कायद्याचा फायदा शेतकर्यांना होणार असेल तर मग सरकार एमएसपीसाठी कायदा का करत नाही. 

अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचा कृषी कायद्याचा फायदा होणार आहे असे यावर शेतकरी म्हणाले आहेत. तसेच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता, तसाच कारभार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जर आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्याला विरोध केला असता, असे एका शेतकर्याने सांगितले. त्यावर शेतकर्यांच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकर्यांच्या आवाजाने स्वतंत्र होईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.