काँग्रेस पक्ष विरोधाचे राजकारण करत आहे - नरेंद्र मोदी

September 30,2020

नवी दिल्ली : ३० सप्टेंबर - पेरणी करण्यापूर्वी शेतकरी ज्याची पूजा करतात, त्याच ट्रॅक्टरला कॉंगे्रसच्या नेत्यांनी आग लावली. सलग चार पिढ्यांनी राज्य केल्यानंतर, आता विरोधी बाकावर आलेल्या कॉंगे्रस पक्षाला नैराश्याने ग्रासले आहे. केवळ विरोध म्हणून या पक्षाने विरोधाचे राजकारण सुरू केले आहे, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केला.

गंगा स्वच्छता अभियानाचा घटक असलेल्या ‘नमामी गंगे’ अभियानांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी  उत्तराखंडमधील सहा मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते.

जल जीवन अभियानाच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पाणी पोहोचविले जाईल. गंगा म्हणजे आपला वारसा आहे. ती देशातील नागरिकांना समृद्ध करते. यापूर्वीही गंगा स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. मात्र, त्यात जनतेची भागीदारी नव्हती. त्याच पद्धतींचा अवलंब केला असता, तर गंगा स्वच्छ झाली नसती, असे मोदी म्हणाले.

विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. सरकारला विरोध तर करायचा, पण कोणत्या मुद्यावर, हा प्रश्न त्यांना सतावत आहे आणि म्हणूनच मिळेल त्या मुद्याला ते शस्त्र बनवत आहेत. आपण विरोधक आहोत आणि विरोध हाच आपला उपक्रम असायला हवा, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. देशात लागू झालेला नवा कृषी कायदा शेतकर्यांच्या हितात असतानाही, त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, कॉंगे्रसला शेतकर्यांचे नाही, तर दलाल आणि मध्यस्थांचे हित जोपासायचे आहे. शेतकरी बंधमुक्त होणे त्यांना मान्यच नाही, म्हणूनच इतकी वर्षे सत्ता गाजवल्यानंतरही शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या नव्हत्या, असा स्पष्ट आरोप पंतप्रधानांनी केला.

हा एक असा पक्ष आहे, ज्याने गरिबांना बँकेपर्यंत पोहोचविणार्या जनधन योजनेला, देशभरात एकच करप्रणाली लागू करणार्या जीएसटीला, सशस्त्र जवानांसाठी असलेल्या वन रॅक वन पेन्शनला, राफेल, गरिबांना आरक्षण देण्याला विरोध केला आहे. समाजातील कोणत्याही घटकाचे चांगले झालेले या पक्षाला पाहावतच नाही, असे त्यांनी सांगितले.

या पक्षाच्या, किंबहुना पक्षाची सूत्रे असलेल्या घराण्यातील चार पिढ्यांनी या देशावर सलग राज्य केले आहे, पण आता इतरांच्या खांद्याची मदत घेऊनही केंद्रातील सत्ता प्राप्त करणे कॉंगे्रसला शक्य होत नाही आणि हेच त्यांच्या नैराश्याचे खरे कारण आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.