नक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी

September 28,2020

गोंदिया : २८ सप्टेंबर - घातपात घडविणे तसेच पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने देवरी तालुक्यातील कोसबी जंगल परिसरात नक्षल्यांनी पेरुन ठेवलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन निकामी करण्यात आले. ही कामगिरी  २७ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिसांनी केली.

घातपात घडविण्याच्या तसेच पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्यातंर्गत कोसबी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरुन ठेवल्याची माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे देवरीचे सी-६0 कमांडो पथक, स्फोटके निकामी करणारे पथक, नक्षल सेल व चिचगड पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी कोसबी जंगल परिसरात शोध मोहिम राबविली असता कोसबी ते धानोरी जंगल मार्गावर स्फोटके पेरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलिस दलाने तेथून आईडी या स्फोटकासाठी वापरलेल्या निळ्या रंगाचा प्लॉस्टीक ड्रम, पिवळ्या व पांढर्या रंगाची ज्वलनशील पावडर, सुपर पॉवर जिलेटीन, जीवंत इलेक्ट्रीक डेटोनेटर, लोखंडी पत्रे व खिळे, जाड काचेचे तुकडे, काळा व पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रीक बॅटरा, प्रेशर कुकर, नक्षल पत्रके आदी साहित्य ताब्यात घेऊन स्फोटक साहित्य निकामी केले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात देवरीचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकूल, नक्षल सेलचे सहायक पोलिस निरीक्षक बच्छाव, चिचगडचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल तवाडे, सी-६0 कमांडो पथकाचे लांडगे, देवरी नक्षल सेल, सशस्त्र दूरक्षेत्र गणूटोला, बाँम्ब शोधक यांनी केली.