महिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला

September 28,2020

अमरावती : २८ सप्टेंबर - चांदूर रेल्वे तळेगाव दशासर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या व चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळील सुलतानपूर येथे एका महिलेच्या घरी धाड टाकून ५७ किलो गांजा जप्त केल्याची कारवाई शनिवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक व तळेगाव दशासर पोलिसांनी संयुक्तरित्या केली. यामध्ये एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे असुन एकुण ७ लाख ३६ हजार ६८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २६ सप्टेंबरला रात्री १0 वाजताच्या सुमारास तळेगाव दशासर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक कांबळे व अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील अजय आकरे यांना ग्राम सुलतानपूर येथे एका ३४ वर्षीय महिलेच्या घरी गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करिता बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीवरून चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनात तळेगाव पोलिस व पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक या दोन्ही चमूंनी संयुक्तरित्या सुलतानपूर या गावात एका ३४ वर्षीय महिलेच्या घरी पंचांसमक्ष धाड टाकली असता घरामध्ये एकूण आठ बॉक्स दिसून आले. सदर बॉक्स खोलून पाहिले असता त्यामध्ये गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी सर्व ८ बॉक्स मधील गांजा एकूण वजन ५७ किलो ५७0 ग्रॅम किंमत ६ लाख ८४ हजार ६८४ रुपयांचा माल व मोटरसायकल क्रमांक एमएच २७ बीए ३८२६ (बजाज डिस्कव्हर निळसर रंगाची) किंमत ३0 हजार रुपये व दोन जुने वापरते मोबाईल किंमत २२ हजार रुपये असा एकूण ७ लाख ३६ हजार ६८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी ३४ वर्षीय महिलेसह तिच्या घरात असलेले अरविंद आत्माराम मोहोड (वय ५५ वर्ष) रा. मेहरबाबानगर चांदूर रेल्वे व सूरज संजय नगराळे (वय २२ वर्ष) रा. धामक अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या वैद्यकीय तपासणी नंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव दशासर पोलिसांनी केली. या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री हरीबालाजी एन., चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे व धामणगाव रेल्वेचे ठाणेदार ब्रह्मनंद शेळके यांच्या मार्गदर्शनात तळेगाव दशासर चे ठाणेदार अशोक कांबळे करीत आहे