दारूविक्रीची माहिती दिल्यामुळे केला चाकूहल्ला

September 28,2020

अमरावती : २८ सप्टेंबर -  दारूबंदी मंडळाकडे दारू विक्रीची माहिती दिल्याच्या कारणाहून तुळशीराम (55) व नागेश भोयर (19) या बापलेकाने शत्रृघ्न भोयर (24) याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील मंगरुळ येथे घडली. या प्रकरण बापलेकाला गिरड पोलिसांनी अटक केली.

प्राप्त माहितीनुसार शनिवार 26 रोजी सायंकाळच्या सुमारास शत्रुघ्न विठ्ठल भोयर याच्या शेजारी राहणार्या तुळशीराम मंगरुजी भोयर व त्यांचा मुलगा नागेश या बापलेक घरी मोहाची दारू काढत होते. या संदर्भात शत्रुघ्न भोयर याने काही दिवसांपूर्वी गावातील दारू बंदी मंडळाकडे तक्रार केली होती. तेव्हा पासून ते शत्रुघ्नचा राग करीत होते.

 तीन दिवसांपूर्वी शत्रुघ्नच्या आईने तुळशीराम भोयरच्या घरासमोर पाणी फेकल्याच्या कारणाहून तुळशीरामने तीला शिवीगाळ केली होती. यावरुन शत्रुघ्नला नागेश व तुळशीराम यांनी वाद घालून चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शत्रुघ्न गंभीर जखमी झाला त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांनी मंगरुळ येथे पोहोचून घटनेची माहिती घेतली. गिरड पोलिसांनी अवघ्या काही तासात तुळशीराम व नागेश भोयर यांना अटक केली. ही कारवाई गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी, पंचम कोटगिलवार, प्रशांत ठोंबरे, राहुल मानकर, महैद्र गिरी, रवी घाटुरले यांनी केली.