भंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी

September 28,2020

भंडारा : २८ सप्टेंबर - भंडारा जिल्ह्यात त्यातच भंडारा शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कोरोना साखळी तोडता यावी म्हणून भंडारा शहरात २ ते ४ ऑक्टोंबर असे ३ दिवस जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज नगर पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

 कोरोना दिवसेंदिवस शहरात हातपाय पसरू लागला आहे. जवळपास सर्वच भागात त्याने प्रवेश केला आहे. कोरोणाचे वाढते संक्रमण तोडण्यासाठी आता गर्दी टाळणे आणि काळजी घेणे हाच एक पर्याय असून त्या अनुषंगाने आज नगराध्यक्ष खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत नगर पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात बैठक घेतली. बैठकीत सर्व प्रकारचे व्यावसायिक उपस्थित होते. अनेक व्यापाऱ्यांनी संचारबंदी संदर्भात आपले मत मांडले. आठ ते दहा दिवसाच्या संचारबंदी ला काहींचा आक्षेप दिसला. यावेळी व्यावसायिक v त्यांच्या दुकानातील कर्मचारी यांची प्रशासनाने चाचणी करावी, अशी मागणी केली गेली. सोबतच दुकान बंद करण्याची आज असलेली ५ वाजताची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.

 या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे, नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले. अनेक विषयांवर चर्चा झाल्या नंतर नगराध्यक्ष खासदार सुनील मेंढे यांनी २,३ व ४ ऑक्टोंबर असे तीन दिवस शहरात जनता संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर दर आठवड्यात शनिवार, रविवार संचारबंदी लागू राहील, असे ठरविण्यात आले. या दोन्ही निर्णयाला व्यापारी बांधवांनी सहमती दर्शविल्याने जनता संचारबंदी चा निर्णय घेतला गेला आहे.

 व्यापाऱ्यांच्या असलेल्या अडचणी रास्त आहेत. पण आज वाढता प्रादुर्भाव पहाता हे करणे गरजेचे आहे. दुकानाची वेळ वाढविण्यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असेही खा. मेंढे यांनी सांगितले. आ. नरेंद्र भोंडेकर यांनी नगर पालिकेने जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. तीन दिवसांची संचारबंदी चे त्यांनीही समर्थन केले. यावेळी पालिकेच्या सिओ मीनल करणवाल, विनोद जाधव, पोलीस निरीक्षक कनसे उपस्थित होते.