जंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह

September 28,2020

चंद्रपूर : २८ सप्टेंबर - सावली तालुक्यातील अंतरगाव येथील नवभारत शाळेच्या परीसरात एक बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळल्याची घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. ही घटना ताजी असताना सोमवार, 28 सप्टेंबर रोजी पुन्हा तालुक्यातील लोंढली जंगल परिसरात पुन्हा एका मादी बिबट्याच्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 तालुक्यातील अनेक गाव चोहोबाजूंनी जंगलव्याप्त असून, सध्या येथे वाघ व बिबट्याची दहशत पसरलेली आहे. या परिसरात काही हिंस्त्र घटना सुध्दा घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कापसी गावातील एका 10 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर अंतरगाव येथे एका बिबट्याचा मृतदेह आढळला. यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास व्यहाड खुर्द उप वनपरीक्षेत्र शिरशी बीट कक्ष क्रमांक 1534 जवळ शेतशिवाराची सीमा असलेल्या परिसरात मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती सिरसी येथील वनरक्षक चौधरी यांना देण्यात आली. त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देताच सर्व वनाधिकारी व त्यांच्या चमूने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतक मादी बिबट्याच्या मान, पोटाला जखमा व दात व नख तुटलेले आढळून आले. या मादी बिबट्याचा मृत्यू वन्यप्राण्यासोबतच्या झुंजीत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी उत्तरीय तपासणी नंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे विनविभागाकडून सांगण्यात आले आहे. मृतक मादी बिबट्याला उत्तरीय तपासणीकरिता चंद्रपूर येथे नेण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली उप वनपरीक्षेत्र अधिकारी बुराडे व वनकर्मचारी करीत आहेत.

 तालुक्यातील वनविभागाच्या व्याहाड खुर्द क्षेत्रामध्ये मागील 6 महिन्यात एक वाघ व एका बिबट्याची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दोन वर्षीय बिबट्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. अशा वारंवार घडणार्या घटनांवर व्याहाड खुर्द क्षेत्राचे क्षेत्रपाल नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत आहेत. यावरून आपल्या क्षेत्रात ते जंगलात गस्तीवर जातात की नाही, यावरही संशय निर्माण होत आहे, असा आरोप शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी केला आहे. या क्षेत्रात जंगली प्राण्यांची अवैध शिकार सुद्धा सुरू असून, यावर अजूनपर्यंत अंकुश लावण्यात आला नाही. त्यामुळे अवैध शिकारीस क्षेत्रपाल यांचे सहकार्य तर नाही ना, तसेच अवैध शिकार करणार्यांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने क्षेत्रपाल यांना अभय तर नाही, असा सुध्दा प्रश्न निर्माण होत असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.