रस्त्यावरील दुकानदारांना व्यवसाय करू द्या - प्रकाश गजभिये यांचे पोलीस आयुक्तांना साकडे

September 24,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - कोरोनामुळे गरिबांचे हाल होत आहेत. लहान दुकानदारांचा तर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. टाळेबंदीमुळे त्यांचा व्यवसाय पूर्ण बुडाला होता. त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी व्यवसाय करू द्या अशी गळ माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी ओलीस आयुक्त अमितेशकुमार यांना घातली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही केला. 

शहरात ४० हजाराच्या वर हॉकर्स रस्त्यावर आपला छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु श्रीमंत लोक गरीब हॉकर्सला व्यवसाय करू देत नाही. पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडे वारंवार तक्रार करतात. व्हेंडिंग ऍक्ट २०१४ नुसार गरीब हॉकर्सवर पोलीस व मनपा प्रशासनाला कारवाई करता येत नाही, तरीही मनपा आणि पोलीस त्यांना व्यवसाय करू देत नाही. उच्च न्यायालयाने सामाजिक दूरत्व ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी दिली असता हॉकर्सला विनाकारण त्रास का देता? असा प्रश्नही गजभिये यांनी उपस्थित केला. गरीब हॉकर्सला व्यवसाय करण्यास मनाई केली जात असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती गजभिये यांनी पोलीस आयुक्तांना केली. सुरक्षित अंतर ठेवले तर व्यवसाय करण्यास मनाई नाही असे पोलीस  आयुक्तांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळात गोपी अंभोरे, अविनाश तिरपुडे, संदीप शाहू, अमीरचंद जैन, राहुल वाडेकर, बबन मलिक आदींचा समावेश होता.