मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

September 24,2020

कोल्हापूर : २४ सप्टेंबर - सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १0 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १0 ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असे सांगण्यात आले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.

कोल्हापुरात मराठा गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकूण १५ ठराव करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. यावेळी ९ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ अशी माहिती देण्यात आली. तसेच पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरू राहील असेही सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पण ती कधी आणि कशी दिली जाईल याचा खुलासा होणे आवश्यक आहे. सरकार फक्त घोषणा करत असून त्यांच्याकडे बजेट नाही, अधिवेशनात तरतूद नाही, असे यावेळी त्यांनी म्हटले. सरकारने ठरावांची अमलबजावणी केली नाही तर १0 तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.