चीनने भारतावर सायबर हल्ला करण्याचाही केला प्रयत्न

September 24,2020

वॉशिंग्टन : २४ सप्टेंबर - भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील पाच महिन्यांपासून तणाव सुरू आहे. भारताशी लागून असलेल्या जवळपास ३५00 किमी सीमेवर चीनने आक्रमक भूमिका अवलंबली आहे. भारताविरोधात फक्त लष्करी पातळीवर चीनने आक्रमक भूमिका घेतली नसून सायबर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिनी हॅकर्स २00७ पासून भारताच्या सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्कवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा एका अमेरिकन संस्थेने केला आहे.

अमेरिकेतील चायना एअरोस्पेस स्टडीज इन्स्टिट्यूट ही संस्था चीनच्या अंतराळातील हालचालींवर देखरेख ठेवते. या संस्थेच्या माहितीनुसार, चीनने भारताच्या सॅटेलाइट कम्युनिकेशनवर २0१७ मध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला मागील १३ वर्षांपासून सुरू असलेल्या हल्ल्याचा एक भाग होता. मात्र, चिनी हॅकर्सने केलेल्या हल्ल्यात भारताचे नुकसान झाले नसल्याचेही समोर आले आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशनवर सॅटेलाइट हल्ला हा मोठा धोका असल्याचे याआधीच इस्रोने म्हटले होते.

सीएएसआयच्या १४२ पानांच्या अहवालानुसार, २0१२ ते २0१८ दरम्यान, चीनने अनेकदा भारतीय नेटवर्कवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वर्ष २0१२ मध्ये जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) वर चीनने नेटवर्कवर सायबर हल्ला केला. या हल्ल्याद्वारे चीनला जेपीएलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचे होते. या अहवालात अन्य काही सायबर हल्ल्यांच्या माहितीसह काही सूत्रांबाबतही नमूद करण्यात आले आहे. उअरकने अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनचाही उल्लेख केला आहे. यामध्ये चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी अंतराळतही हल्ला करता येऊ शकतो, सॅटेलाइट हॅक करता येतील असे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नात असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या सायबर हल्ल्यातील स्रोतांची माहिती समोर आली नसल्याचे भारतातील सूत्रांनी दिली. इस्रोच्या सिस्टिम हॅकिंगचे प्रयत्न कोणत्या भागातून झाले, याची माहिती समोर आली नाही. मात्र, हॅकिंग झाल्यास त्याचा अलर्ट इस्राोला ताबडतोब मिळतो. चीनकडून अनेकदा हल्ल्याचे प्रयत्न झाले. मात्र, इस्रोच्या सॅटेलाइट सिस्टिमचे अद्याप काहीही नुकसान झाले नसल्याचे एका अधिकार्याने म्हटले.